Monday, 15 January 2018

शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



       

        जिमाका-जळगाव, दि. १५:- आदिवासी प्रकल्पातंर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील आजारी विद्यार्थ्यासाठी प्रत्येक शाळेने परिस्थितीनुसार सिकरुम तयार करावीत तसेच विद्यार्थ्यांवर तातडीचा उपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
            शासकीय आश्रमशाळेतील सोयीसुविधाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न्‍ झाली. यावेळी त्यांनी वरील सुचना केली. या बैठकीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आर. बी. हिवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कलमापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे आदि उपस्थित होते.
            या बैठकीत शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळण्यासाठी विशेष केंद्रीय योजनेतून आर. ओ. मशीन पुरविण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हिवताप होवू नये यासाठी त्यांची हिवताप कार्यालयामार्फत्‍ तपासणी करणे तसेच परिसराची फवारणी करणे, आश्रमशाळांचे विद्युतीकरण करणे, आश्रमशाळांना पाणीपुरवठा करणे, जेथे आश्रमशाळेस स्वत:ची जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी सर्व सोयीनीयुक्त इमारत उभारणे, तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, त्यांना पुरविण्यात येणारे बेडींग साहित्य, भोजन, शाळेला संरक्षक भिंत बांधणे आदि विषयावर चर्चा करण्यात आली.
            तसेच शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय गटशिक्षण अधिकारी यांचेमार्फत शैक्षणिक दर्जा व वार्षिक तपासण्या करणे. विद्यार्थ्याचे समुपदेशन करणे, त्यांना कायदेविषयक ज्ञान देणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शनासाठी चर्चासत्र ठेवणेबाबतही जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्यात.
0 0 0

No comments:

Post a Comment