Friday, 22 January 2021

नाबार्डद्वारे महिला बचतगटांना सॅनिटरी नॅपकीन संयंत्राचे वितरण

 



            जळगाव, दि. 22 - नाबार्डच्या सॅनिटरी नॅपकीन पायलट प्रोजेक्टचे महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 15 ऑक्टोबर, 2020 रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या प्रोजेक्टसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त जळगाव जनता सहकारी बँकेची निवड करुन बँकेचा झाशीची राणी महिला बचतगट निवडण्यात आला होता.             सॅनिटरी नॅपकीनच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी मशीनरी आज जळगाव शहरात दाखल झाली असून उत्पादनास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या पायलट प्रोजेक्टचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संपन्न झाले. 

            याप्रसंगी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा विकास अधिकारी श्री. श्रीकांत झांबरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालतील निवासी दंतरोग तज्ञ डॉ. अनुराधा वानखेडे राऊत, स्रीरोग तज्ञ डॉ.अंजली भिरुड, जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक कृष्णा कामाठे, संचालिका डॉ. सौ आरती हुजूरबाजार, सौ सावित्री सोळुंखे, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, उपमहाव्यवस्थापक नितिन चौधरी उपस्थित होते.  

            कार्यक्रमाच्या सुरवातीस महिलांचे मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे पार पडले. यानंतर डॉ. अंजली भिरुड व डॉ. अनुराधा वानखेडे राऊत यांनी महिलांना सॅनिटरी नॅपकीनच्या वापराबाबत व आरोग्याबाबत जागरूकता ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या  (नाबार्ड) च्या वतीने महिलांच्या स्वछता, उदरनिर्वाह व आरोग्यविषयी जागरूकता अनुषंगाने चित्रफित दाखविण्यात आली.

            जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, आपण बालिका दिन हा 24 जानेवारी रोजी साजरा करतो व त्या अनुषंगाने हा प्रकल्प ह्या सप्ताहात राबविला जात आहे हा दुग्धशर्करा योगच आहे. महिलांना आर्थिक पाठबळासोबत भावनिक पाठबळ अत्यंत महत्वाचे आहे जे बँकेने महिलांना दिले. त्यामुळे महिला सक्षम होण्यास हातभार लागला आहे. किशोरवयीन वयापासून मुलींची सुदृढ जोपासना केली तरच चांगली पिढी निर्माण होईल व भारताचे भविष्य उज्ज्वल होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर झाशीची राणी महिला बचत गट यांचा सदर प्रोजेक्ट मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात बँकेचे संचालक श्री कृष्णा कामठे यांनी या नवीन प्रकल्पाला कार्यन्वित करून यशस्वी करण्यासाठी बँक सर्वतोपरी मदत करेल असे प्रतिपादन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकात बँकेची या चळवळीला जोडून घेण्यामागची भूमिका व महिलांसाठीच्या योजना व बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा विकास अधिकारी श्री. श्रीकांत झांबरे यांनी या उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. आभार प्रदर्शन अधिकारी नितिन चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बँकेच्या अधिकारी सौ स्वाती भावसार यांनी केले.

            राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व नॅब फाऊंडेशन यांचेकडून संपूर्ण भारतात केवळ 30 बचतगट निवडण्यात आले व महाराष्ट्रातून फक्त एकच बचतगट निवडला गेला होता व  याचा सन्मान जळगाव जनता सहकारी बँकेला मिळाला. गेल्या 15 वर्षापासून जळगाव जनता सहकारी बँक नाबार्ड सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बचतगटांचे काम करीत आहे. नॅब फाऊंडेशनने हा सर्व पायलट प्रोजेक्ट तयार केला असून ते संपूर्ण भारतभर हा प्रोजेक्ट राबवित आहेत. या सर्व कार्यक्रमांतर्गत देशाचे पॅडमॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मरुगनंतम यांनी ही संकल्पना रुजवली व सर्वांसमोर महिला आरोग्याबाबत विषय मांडला. या सर्व विषयाला मूर्तस्वरूप नॅब फाऊंडेशनने दिले व संपूर्ण भारतासाठी पायलट प्रोजेक्ट तयार केला असल्याचे श्री. झांबरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment