जळगाव, दि. 22 (जिमाका) - जिल्ह्यात 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी, 2021 रोजी जिल्हा मुख्यालय, तालुका व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व मतदारांना “सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक बनविण्यासाठी कटिबध्द” हे घोषवाक्य (Theme) भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
यानिमित्त जिल्ह्यातील मतदारांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि. 23 ते 25 जानेवारी, 2021 या कालावधीत मतदार nvdjalgaon.in किंवा jalgaon.gov.in या वेबलिंकवर लॉगीन करुन स्पर्धेत सहभागी होवू शकतात. एकूण 20 प्रश्नांसाठी 7 मिनीटे वेळ दिलेला असून 70% पेक्षा अधिक गुण मिळविणा-या स्पर्धकास प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार आहे. याशिवाय सर्वाधिक गुण मिळविणा-या तालुकानिहाय दोन स्पर्धकांचा राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिवसाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे दि. 25 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त, पद्मश्री श्रीमती निलिमा मिश्रा, जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगांव, कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, जळगांव तसेच आयुक्त, जळगांव शहर महानगरपालिका हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हाधिकारी जळगाव यांच्या https://www.facebook.com/JalgaonDM/ या फेसबुक पेजनवर लाईव्ह करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व मतदारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 00000
No comments:
Post a Comment