Friday, 13 May 2022

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वडमुखवाडी ( चऱ्होली ) ता. हवेली, जि. पुणे येथील नुतन प्रशिक्षण संकुल लोकार्पण सोहळा .

 जळगाव, दि.13 (जिमाका वृत्तसेवा) : -  प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन  प्रशिक्षण संस्था वडमुखवाडी ( चऱ्होली) ता. हवेली, जि. पुणे  या संस्थेचे नवीन प्रशिक्षण संकुल वडमुखवाडी (चऱ्होली), पुणे –आळंदी रस्ता, तापकिर चौक, पुणे-412105 येथे 15 एकर परिसरामध्ये उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण संकुलाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक- 16 मे,2022 रोजी दु. 2.00 वाजता  मा.ना. श्री. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे शुभहस्ते  व मा.ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली,मा.ना.श्री. दिलीपराव वळसेपाटील, मंत्री गृह महाराष्ट्र राज्य, तसेच मा.ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री कृषि, महाराष्ट्र राज्य, मा.ना. डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री कृषि, महाराष्ट्र राज्य, मा.ना. श्री. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स व्यवसाय, सामान्य प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्रीम.डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य,  मा.डॉ. अमोल कोल्हे, लोकसभा सदस्य, मा. श्री. श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य अणि मा.श्री. महेश लांडगे, विधानसभा सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

रामेती, पुणे संस्था वनामती, नागपूर या राज्यस्तरीय शिखर संस्थेच्या अधिनस्त कार्यरत आहे. सदर संस्था दौंड येथून पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आली. पुणे येथे प्रशिक्षण हॉल व प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था इत्यादीची गैरसोय होती. मौजे वडमुखवाडी( चऱ्होली) ता. हवेली, जि. पुणे  येथील तालुका बिज गुणन केंद्राच्या मालकीच्या 12.31 हेक्टर प्रक्षेत्रापैकी  6.00 हेक्टर क्षेत्र रामेती,पुणे या संस्थेस देणेबाबत निर्णय घेण्यात आला, त्यानुसार 6.00 हेक्टर क्षेत्र रामेती पुणे या संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले. रामेती, पुणे संस्थेची सर्व अपेक्षीत बांधकामे पुर्ण झाली असून आजमितीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभांगाची नाहरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. त्याच प्रमाणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून  भाग भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

            सदर प्रक्षेत्रावर 2145.29 चौ.मी. क्षेत्रावर प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे.  पहिल्या मजल्यावर एकूण 9 कक्ष (संचालक, प्राचार्य, सहाय्यक संचालक, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय व संगणक कक्ष) असून, 2  प्रशिक्षण हॉल, 6 सिंडीकेट रूम, 1 ग्रंथालय आहे. दुसऱ्या मजल्यावर 1 संगणक कक्ष ( 30 संगणकासह) 1 समिती सभागृह, सहाय्यक प्राध्यापक कक्ष, भांडार कक्ष, प्रदर्शन हॉल या प्रमाणे सुविधा आहेत. संगणक कक्षामध्ये सर्व संगणकांसाठी इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच दोन्ही मजल्यांवरील कक्षांमध्ये देखील इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे.

            प्रशिक्षण केंद्रावर 2424 .30 चौ.मी. क्षेत्रावर वसतिगृह इमारत असून प्रशिक्षणांर्थीसाठी  36 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्य 3 प्रशिक्षणार्थींकरीता निवास व्यवस्था करण्यात आली आहे. (108 प्रशिक्षणार्थी ) तसेच 2 हॉल असून सध्याचे प्रशिक्षणाचे लक्षांक विचारात घेता त्याचे रूपांतर प्रशिक्षण कक्षामध्ये करण्यात येत आहे.  1 समिती सभागृह, भोजन कक्ष, योगा हॉल या प्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत. प्रक्षेत्रावर 80 चौ.मी. क्षेत्रावर अधिकारी निवासस्थान बांधण्यात आले आहे.

            प्रक्षेत्रावरील 3 हेक्टर क्षेत्रावर  आंबा, पेरू, सिताफळ, आवळा, नारळ, चिक्कू इत्यादी फळझाडांच्या लागवडीसाठी प्लॉटस् तयार करण्यात आले आहेत. तसेच फळबागेसाठी ठिबक सिंचन सुविधा निर्माण करण्यात आली आहे. माहे जून,2022 मध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. या फळझाडांची लागवड आधुनिक तंत्रज्ञानानुसार करण्यात येणार असून त्याचा उपयोग प्रात्यक्षिक म्हणून प्रशिक्षणांर्थींसाठी होणार आहे.

            सदर संस्थेमार्फत कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी प्रशासकीय व तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात, त्यामध्ये अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. राज्य प्रशिक्षण धोरणा अंतर्गत इतर विभागांकरिता  वर्ग 2 व 3 या संवर्गाकरिता विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. या व्यतिरिक्त कृषि विभागातील अधिकारी अणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र व कृषि विद्यापिठे यांचेशी समन्वय साधून प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते.

            रामेती पुणे या संस्थेमार्फत भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थांसोबत करार करून काही विशेष प्रशिक्षणांचे   आयोजन करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment