Monday, 24 September 2018

कुष्ठरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी यंत्रणेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर




जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, संपुर्ण राज्यात कुष्ठरोग शोध अभियान 2018-19 राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात 24 सप्टेंबर, 2018 ते 9 ऑक्टोंबर, 2018 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणार असल्याने जिल्ह्यातून कुष्ठरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी सर्व नागरिकांनी त्यांना तपासणीसाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
            राष्ट्रीय कुष्ठरोग शोध अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके,  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा वर्कर, नर्सेस, सोशल वर्कर, महानगरपालीकेचा आरोग्य विभाग, नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी असे एकूण 5758 जणांच्या 2879 टिम ज्यामध्ये प्रत्येकी एक पुरूष व एक महिलेचा समावेश करण्यात आला आहे या टीम 24 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या सर्व्हेसाठी सज्ज झाल्या आहेत. 75 टिम्स ह्या जळगाव शहरात तर 2879 टिम्स ह्या ग्रामीण भागातील नागरिकांचे स्वर्हेक्षण करणार आहेत. या सर्व टिम मधील सदस्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले असून जिल्ह्याचा सर्व्हे करण्यासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांना सहकार्य करून राष्ट्रीय कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर यांनी राष्ट्रीय कुष्ठरोग शोध अभियानाचा उद्देश, महत्व व कार्यपध्दती बाबत सविस्तर मार्गदर्शन करत म्हणाले, समाजातील लपून राहिलेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नविन सांसर्गिक कुष्ठरूग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणल्यामुळे संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्याबाबतचे सादरीकरण यावेळी केले.
सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जिल्ह्यातील 33 लाख 38 हजार 290 नागरीकांची व एकूण 6 लाख 78 हजार 867 घरांचे एकूण 14 दिवसात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ॲलर्ट इंडिया या संस्थेचे विशेष सहाय लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment