Saturday, 1 September 2018

‘लोकराज्य वाचक अभियाना’ चा जळगावात शुभारंभ लोकराज्य मासिक स्पर्धा परिक्षांसह सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर


           
 

           जळगाव, (जि.मा.का.) दि. 1 - महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातील माहिती ही स्पर्धा परिक्षांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे नियमितपणे वाचन करावे. असे मत अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केले.
            जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आज ‘लोकराज्य वाचक अभियाना’ चा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. गाडीलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.
            सध्याच्या काळात मुलांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, सर्वांगिण विकासासाठी अवांतर वाचन तसेच शालेय शिक्षणाखेरीज इतर माहिती असणे आवश्यक आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन समाजसेवा करता येणे ही जीवनातील एक मोठी संधी आहे. ही संधी साधण्यासाठी लोकराज्य मासिकाचे वाचन अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही अशा प्रकारच्या मासिकाचे वाचन केल्याने त्यांना त्यांच्या पाल्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती मिळेल. पूर्वीच्या काळात माहितीची साधने कमी होती. त्यामुळे कोणत्या क्षेत्रात संधी आहेत. सरकार त्यासाठी आपल्याला काय देते याची माहिती मिळत नसे. पण आता लोकराज्य सारख्या मासिकातून तुम्हाला करियर करताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणत्या शासकीय योजना आहेत. याची सर्व माहिती मिळू शकते. तसेच लोकराज्य मासिकांचे विविध विशेषांक हे वाचनिय व माहितीपूर्ण असतात. लोकराज्य मासिकाचा ‘वारी’ विशेषांक वाचल्यावर आपल्याला पंढरपूरच्या वारी ची अनुभूती मिळत असल्याचे सांगून त्यांनी वारी विशेषाकांचे कौतूक केले. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहनही श्री. गाडीलकर यांनी यावेळी केले.
‘लोकराज्य वाचक अभियान’ वाचकांना प्रेरणादारी - प्राचार्य डॉ. राणे
            लोकराज्य मासिकाने विविध विशेषाकांच्या माध्यमातून वाचकांना अनेक विषायांची मेजवाणी उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगून बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे म्हणाले की, सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सुरु करण्यात आलेले लोकराज्य वाचन अभियान हे वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन करुन शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्याचे आवाहनही डॉ. राणे यांनी उपस्थितांना केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी स्पर्धा परिक्षांसाठी लोकराज्य मासिकाचे असलेले महत्व व उपयुक्तता सांगतानाच लोकराज्य वाचक अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. त्याचबरोबर लोकराज्य ची आतापर्यंतची वाटचालीची व शासनाच्या युवा माहिती दूत उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच लोकराज्य वाचक अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. बोडके यांनी मान्यवरांचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेली महाराष्ट्र वार्षिकी 2018 व लोकराज्य मासिकाचा वारी विशेषांक देऊन स्वागत केले.
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मानले. या मेळाव्यास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकराज्य विक्री स्टॉलला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
‘लोकराज्‍य’ वाचक अभियानानिमित्त आयोजित मेळाव्याच्या ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘लोकराज्य’ अंक विक्री व प्रदर्शनाचा स्टॉल मांडण्यात आला होता. या स्टॉलला मान्यवरांनी भेट दिली. यास विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसादर मिळाला. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी सुरेश सानप, दिलीप खैरणार, रामकृष्ण कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
000

No comments:

Post a Comment