Friday, 7 August 2020

कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपाययोजना

         जळगांव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) - कापुस पिकावर शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सदर किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास येत्या हंगामात पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.  

            किडीचा ओळख - पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे 11 ते 13 मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो तो नंतर शरीरावर पसरल्याने अळीचे शरीर गुलाबी दिसते. कोषावस्था लालसर तपकिरी रंगाची तर पतंग करडया रंगाचे असतात

            नुकसानीचा प्रकार - सुरुवातीला अळ्या पाते, कळया, फुलांवर उपजिविका करतात, प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट अमलेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळयांना डोमकळया म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात. अळी बोंडातील बिया खाते त्याचबरोबर अळीने रुई कातरुन नुकसान केल्याने रुईची प्रत खालावते. तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते.

         एकात्मिक व्यवस्थापन - सर्व्हेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे व सामुहीक अटकाव करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत, शेंदरी बोंडअळीग्रस्त डोमकळया नष्ट करा, कपाशीच्या शेता‍त हेक्टरी किमान 10 पक्षी थांबे लावा, शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसुन येताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा ऍझाडिरेक्टीन 10000 पीपीएम 1 मिली किंवा 1500 पीपीएम 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, पीक उगवल्यानंतर 115 दिवसांनी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अथवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी किटकाची हेक्टरी 1.5 लाख अंडी प्रसारीत करा.

        आर्थिक नुकसान पातळी - एक जीवंत अळी प्रती 10 हिरवी बोंडे किंवा प्रती फेरोमन सापळयात आठ ते दहा पतंग सलग 3 दिवस आढळल्यास पुढील पैकी कोणत्याही एक किटकनाशकाची फवारणी करावी.

        पहिल्या फवारणीसाठी यापैकी एक कीटकनाशक - क्विनॉफॉस 20 %ए एफ 20 मि.ली किंवा थायोडीकार्ब 75WP  20 ग्रॅम मात्रा प्रति 10 लिटर पाणी,

दुस-या फवारणीसाठी यापैकी एक- क्लोरोपायरीफॉस 20 ईसी मात्रा प्रति 10 लिटर पाणी 25 मि.ली. थायोडीकार्ब 75 Wp प्रति 10 लिटर पाणी 20 ग्रॅम

तिस-या फवारणीसाठी यापैकी एक-फेनवलरेट 20 ईसी प्रति 10 लिटर पाणी 10 मि.ली. सायपरमेथ्रिन 10 % ईसी प्रति 10 लिटर पाणी 10 मि.ली.  किंवा बीटज्ञ सायफल्सुथ्रीन 2.45 %एस सी प्रति 10 लिटर पाणी 10 मि.ली. पॉवरस्प्रेसाठी किटकनाशकाची मात्रा तिप्पट करावी. 

                                                                         0000

No comments:

Post a Comment