जळगाव, (जिमाका) दि. 13 - परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या तसेच वाहन, पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनांचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे 18 ऑगस्ट, 2020 रोजी 3.00 वाजता करण्यात येणार आहे. असे श्याम लोही, काराधान प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जाहिर लिलाव करावयाचे ठिकाण, अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे.
या वाहनांच्या मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिका-यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. त्यासाठी ही नोटीस जारी करण्यात येत असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत कर/ पर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत. अथवा त्यांना लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 17 ऑगस्ट, 2020 रोजी लेखी हरकत घ्यावी, अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव 18 ऑगस्ट रोजी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
लिलावात सहभागी होणा-या व्यक्तींनी एकूण 10 स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राप्ट बंद लिफाफ्यात 18 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांडड्राफ्ट) हा Dy RTO, Jalgoan या नावे अंदाजित 10 वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस मानंकाप्रमाणे नाव नोंदणी करुन या कार्यालयात उपरोक्त दिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफाफ्यातील डिमांडड्रॉफ्ट खुले करण्यात येतील. ज्या व्यक्तीने सर्वाधिक किमतीचा डिमांड ड्रॉफट जमा केलेला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल. ही नोटीस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, 1966 अन्वये नोंदणी तथा काराधान प्राधिका-यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे. या नोटीसव्दारे वाहनमालकांना/ताबेदारांना/ वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत असल्याचेही श्री. लोही यांनी म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment