Thursday, 29 May 2025

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा

              जळगाव दि - 29 ( जिमाका ) : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम  पुढील प्रमाणे.

            गुरुवार दिनांक 29  मे, 2025 रोजी  संध्याकाळी 6.19  वाजता राजधानी  एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण, रात्री 8.43 वाजता आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान जामनेर जि. जळगावकडे  प्रयाण, रात्री 9.30 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.

००००००००००

महाराणा प्रतापांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील


            अमळनेर, दि. २९ मे (जिमाका वृत्तसेवा) – महाराणा प्रताप हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची ओळख असून युवा पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

            अमळनेर येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जि.म.स. बँकेचे चेअरमन संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमापूजन करून महाराणा प्रतापांना अभिवादन केले.

            स्वाभिमानासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, हे त्यांच्या संघर्षमय जीवनातून स्पष्ट होते, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. जिद्द, निष्ठा आणि देशप्रेम या गुणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी आत्मसात करावे, असे आमदार अनिल पाटील यांनी नमूद केले.

            कार्यक्रमास विविध पदाधिकारी, विद्यार्थी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                 000000000

पॉश ( POSH )कायदा 2013 अंतर्गत खाजगी आस्थापनांना ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी करण्याचे निर्देश

             जळगाव, दि. 29(जिमाका): - कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देणाऱ्या  (POSH - Prevention of Sexual Harassment) कायदा, 2013 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व खाजगी आस्थापनांनी ‘शी बॉक्स पोर्टल’ (SHE BOX Portal) वर अंतर्गत तक्रार निवारण समितीची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

                १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व खाजगी आस्थापनांनी ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी करून त्यांच्या आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘प्रायव्हेट हेड ऑफिस रजिस्ट्रेशन’ (Private Head Office Registration) या टॅबवर क्लिक करून, संबंधित माहिती भरून सादर करणे गरजेचे आहे.

               या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना लवकरात लवकर ‘शी बॉक्स पोर्टल’वर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

०००००००००

जिल्हाधिकारी कार्यालयात 2 जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दिनांक  29 (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक  2 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे.

           या दिवशी संबधित तक्रारदार हे प्रत्यक्ष अर्ज सादर करणार असल्याने संबधित विभागाच्या विभाग प्रमुख यांनी देखील लोकशाही दिनी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

            नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

००००००००००

अमळनेरला भव्य तालुका क्रीडा संकुलाची भेट तालुका क्रीडा संकुल युवाशक्तीला दिशा देणारा ऐतिहासिक टप्पा - मंत्री गुलाबराव पाटील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती







             जळगाव, दि. २८ मे (जिमाका)- "क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची बाब नसून ती शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा विकास करणारी शाळा आहे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात अशा भव्य क्रीडा संकुलाची नितांत आवश्यकता होती. आज ती गरज पूर्ण होत आहे, ही बाब तालुकावासीयांसाठी समाधानाची आणि प्रेरणादायी आहे," असे गौरवोद्गार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

            ते पुढे म्हणाले, "सुदृढ आणि सशक्त युवक म्हणजेच सक्षम राष्ट्राची पायाभरणी आहे. हे संकुल नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा आणि प्रोत्साहन देईल. याच माध्यमातून उद्याचे ऑलिम्पिकपटू घडावेत, हीच अपेक्षा आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर खेळांच्या माध्यमातून मनोबल, सहिष्णुता आणि संघभावना यांचा विकास होतो. शासनाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे," असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

            अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ.अनिल पाटील, माजी आ. साहेबराव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, अमळनेर प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

            कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, "गावा - गावातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ती जर योग्य दिशेने वापरली तर गाव, राज्य आणि देशाचा विकास शक्य होतो. या संकुलामुळे ग्रामीण खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळतील आणि ते प्रेरित होतील, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ आणि क्रीडा संस्कृती ही दोन्ही ग्रामीण विकासासाठी पूरक आहेत," असे मत त्यांनी मांडले.

            आ. अनिल पाटील यांनी तालुक्यातील क्रीडा संस्कृतीसाठी हे नूतन संकुल फार उपयुक्त ठरेल, अशी आशा व्यक्त करत आनंद दर्शविला.या प्रसंगी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, क्रीडाप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्केटिंग खेळाचे प्रात्यक्षिक

            यावेळी सर्व मान्यवरांच्या समोर स्केटिंग मध्ये विशेष प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकवर चित्तथरारक स्केटिंगचा7 खेळ करून दाखविला 

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी सांगितले की, अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्ससाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग, ओपन जिम आदी सुविधा खेळाडूंकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी मानले.

०००००००००००

TAIT-2025 परीक्षा वेळापत्रकात बदल : उर्दू माध्यमातील D.El.Ed विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

         जळगाव दि. 29(जिमाका) :- महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-2025 या परीक्षेचे आयोजन 27 मे ते 30 मे 2025 आणि 2 जून ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. ही परीक्षा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये "पवित्र" प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

              दरम्यान, उर्दू माध्यमातील एकूण 1107 उमेदवारांची डी.एल.एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा आणि TAIT-2025 परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने, संबंधित उमेदवारांची TAIT परीक्षा 3 जून 2025 ऐवजी 30 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

                  तरी विद्यार्थी उमेदवारांनी या बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे. त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराबर राहिल याची नोंद घेण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

००००००००००

गरिब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संधी : "WINGYAAN" अंतर्गत मोफत डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स प्रशिक्षण

             जळगाव दि. 29(जिमाका) :-  फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (FIAPL) आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "WINGYAAN" हा अत्यंत महत्त्वाचा CSR उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास (BPL) मुलींसाठी उच्च शिक्षण आणि रोजगारक्षमता वाढवण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

                 WINGYAAN बॅच-V: "डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स"  हा तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा कोर्स आहे. ज्यात 22 महिन्यांचे शैक्षणिक प्रशिक्षण आणि 14 महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात यशस्वी विद्यार्थिनींना नामांकित कंपन्यांमध्ये सुमारे 20,000/- प्रति महिना पगारासह नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.

                   कोर्स फी, निवास, जेवण, गणवेश आणि वैद्यकीय विमा FIAPL द्वारे प्रायोजित करण्यात येणार आहे. याकरिता उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण व तिचे वय 16 ते 19 वर्षे (10 जून 2025 पर्यंत) पुर्ण असावे. विद्यार्थिनी दारिद्रयरेषेखालील BPL पिवळे रेशन कार्ड धारक असावी.

                    या डिप्लोमा कोर्स करिता  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. अर्ज करण्याकरिता अर्जाची हार्ड कॉपी CSR विभाग, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि., B-19, M.I.D.C. रांजणगांव, ता. शिरूर, जि. पुणे - 412220 व सॉफ्ट कॉपी ईमेल amol.fatale@fiapl.com यावर पाठवावी. तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://jalgaon.gov.in/ जाऊनही अर्ज नोंदवू शकतात

                    अधिक माहितीसाठी अमोल फटाले: +91 9673330468, amol.fatale@fiapl.com, व शुभम बडगुजरः +91 9975103001, Shubham.Badgujar@fiapl.com यांना संपर्क करावा. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

००००००००

Wednesday, 28 May 2025

आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल






             जळगाव, दि. २८ मे (जिमाका वृत्तसेवा): - चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी आज (बुधवार) घटनास्थळी भेट देऊन वैद्यकीय पथकासह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. 

            प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले असून, दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

            ही घटना वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जाने उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली. संबंधित महिला पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत असताना वाटेतच प्रसववेदना सुरू झाल्याने रस्त्यातच बाळाचा जन्म झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरीत हालचाल करून आरोग्य पथकासह संबंधित भागात भेट दिली. सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली असून, बाळ जन्मतः २८०० ग्रॅम वजनाचे होते.

            या घटनेच्या पार्श्वभूमीवर, कर्जाने उपकेंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

00000000

प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा): - राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अधधान्य व वाणिज्यिक पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकऱ्यांना सुधारित व संकरीत वाणांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या माध्यमातून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविला जात असून, प्रति शेतकरी किमान 0.20 ते कमाल 1 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

            या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल व तीळ या पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या पोर्टलवर "बियाणे वितरण - प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक", "औषधे", व "खते" या टाईलखाली अर्ज करावा. प्रथम लाभार्थ्यांची यादी 30 जून 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

            याशिवाय भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी व वरई या पिकांसाठीही अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी 7/12 उतारा व कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला सादर करून अनुदान वजा दराने बियाणे खरेदी करावे.

            प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची "AgriStack" प्रणालीवर नोंदणी आवश्यक आहे. लाभार्थी निवड "First Come First Serve" (FCFS) तत्त्वावर होणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील तंत्र अधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी नवीन अर्ज करण्याचे आवाहन ; महिला शेतकऱ्यांना प्राधान्य

             जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ या योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

            सन 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांची निवड करताना किमान बारावी उत्तीर्ण आणि वयोमर्यादा 25 ते 60 वर्षे अशी अट होती. मात्र, मा. आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत शिक्षण आणि वयोमर्यादा यासंबंधी अटी रद्द करण्यात आल्या आहेत.

            योजनेअंतर्गत महिलांचे शेतीतील योगदान लक्षात घेता, सन 2025-26 या वर्षासाठी महिला शेतकऱ्यांना अभ्यासदौऱ्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे.

            2024-25 मध्ये युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड या देशांची निवड अभ्यासदौऱ्यासाठी करण्यात आली होती. तर 2025-26 या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

            नवीन निकष व दौऱ्याचे देश बदलण्यात आले असल्यामुळे 2024-25 मध्ये करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची यापूर्वी निवड झाली होती, त्यांनी नव्याने अर्ज केल्यास आणि पात्र ठरल्यास त्यांचाही विचार या योजनेंतर्गत केला जाणार आहे, असे तंत्र अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

             जळगाव दि - 28 ( जिमाका ) :   राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,

            गुरुवार  दिनांक 29  मे, 2025  रोजी  रात्री 9. 15 वाजता राजधानी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे रवाना, रात्री 9.30 वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

०००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा २८ मे रोजीचा जळगाव जिल्हा दौरा

              जळगाव दि. 28 ( जिमाका )- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री, गुलाबराव पाटील यांचा  जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

          बुधवार, दिनांक 28 मे, 2025  रोजी  सायंकाळी 7.55 वाजता मुंबई विमानतळ येथून विमानाने जळगावकडे प्रयाण  रात्री 9.10 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण, रात्री 9.30 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला निर्णय ▪ संपूर्ण जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ± झोनमध्ये समाविष्ट! ▪ जिल्ह्यातील उद्योगांसाठी नवसंजीवनी; औद्योगिक सवलतींचा मार्ग मोकळा

 




        जळगाव, दि. २८ मे (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि निर्णायक ठरू शकणारा निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जळगाव औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांना डी ± दर्जा (सवलतींचा झोन) देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे संपूर्ण जिल्हाच डी ± झोनमध्ये समाविष्ट झाला असून, स्थानिक उद्योजकांसाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

            पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आ.सुरेश भोळे ( राजूमामा भोळे ),आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे,आ.किशोर आप्पा पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.अमोल पाटील, आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, धरणगाव आणि यावल या पाच तालुक्यांनाही डी ± दर्जा मिळाला. याआधी जिल्ह्यातील १० तालुके आधीच डी ± झोनमध्ये होते. आता संपूर्ण जिल्हाच सवलतींच्या झोनमध्ये आला आहे.

औद्योगिक गुंतवणुकीस चालना

            उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, डी ± दर्जा मिळाल्यामुळे उद्योगांना हक्काच्या सवलती मिळतील. स्थानिक तरुणांसाठी रोजगार संधी वाढतील. जिल्ह्याचा औद्योगिक पाया अधिक बळकट होईल. यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप

             पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा अनेक वर्षांपासून औद्योगिक सवलतीपासून वंचित होता. सातत्याने उद्योग विभागाकडे पाठपुरावा करून अखेर हा निर्णय मिळविला. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या समतोल औद्योगिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक अर्थचक्राला बळकटी, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा वाढीसाठी हे पाऊल निर्णायक ठरेल.

डी ± दर्ज्यामुळे मिळणाऱ्या प्रमुख सवलती

नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना १० वर्षांसाठी राज्य वस्तू व सेवा करामधून (एस. जी. एस. टी.) १०० टक्के परतावा

विस्तार करणार्‍या उद्योगांना ९ वर्षांसाठी एस. जी. एस. टी. परतावा

मुदत कर्जावर ५ टक्के व्याज परतावा

वीज दर व वापरावर सवलत, वीज शुल्क माफी

पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती

नवीन एम. आय. डी. सी. क्षेत्रांसाठी वेग

            कुसुंबे, चिंचोली आणि पिंपळे येथे एकूण २८५.३१ हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहती विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. यासाठी उद्योगमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि एम. आय. डी. सी. अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. तसेच, जळगाव एम. आय. डी. सी. मध्ये मंजूर झालेल्या ई. एस. आय. सी. रुग्णालयासाठी निवडलेला भूखंड अद्याप हस्तांतरित झालेला नसल्यामुळे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

राजकीय एकजूटीमुळे ऐतिहासिक निर्णय

            या बैठकीस जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींसह विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सह मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरबु, उद्योग संचालक सदाशिव सुरवसे, सहसंचालक चेतन पाटील, महाव्यवस्थापक गांधील, कार्यकारी अभियंता एम. आय. डी. सी., तसेच लघु उद्योग संघटनांचे प्रतिनिधी संतोष इंगळे, रवी फालक, किशोर डांगे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाला, असे बोलले जात आहे.

उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण

> संपूर्ण जिल्हा डी ± झोनमध्ये आल्यामुळे उद्योगांना अपेक्षित सवलती मिळणार आहेत. त्यामुळे नव्या उद्योगांची स्थापना व विस्तार शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक उद्योजकांनी दिली.

    हा निर्णय जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत मैलाचा दगड ठरणार असून, मोठ्या, मध्यम व लघु उद्योजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

000000000


छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ७०० हून अधिक नागरिकांना थेट लाभ पहूर येथे २५ विभागांचे ३८ स्टॉल्स; योजनांचा लाभ मिळाल्याने नागरिक संतुष्ट













             जळगाव दि. 28(जिमाका) :-  छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत पहूर महसूल मंडळाचे समाधान शिबिर आज चंदन मंगल कार्यालय, पहूर येथे उत्साहात पार पडले. २५ विभागांच्या ३८ स्टॉल्सद्वारे ७०१ नागरिकांना थेट लाभ देण्यात आला. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली.

             शिबिरात पी. एम. किसान लाभार्थी ७ लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सेवा: ८२ लाभार्थी, पुरवठा शाखा ५८ लाभार्थी, सेतू केंद्रामार्फत ४५ लाभार्थी, संजय गांधी योजना (DBT प्रक्रिया): ५०७ लाभार्थी अंतर्गत तब्बल ५०७ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला.

               या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

               शिबिरात नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. अनेक नागरिकांनी "पूर्वी महिनाभर लागणारी कामे एका दिवसात झाली", "वेळ आणि पैशांची बचत झाली", अशी प्रतिक्रिया दिली. शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढवून योजनांची अंमलबजावणी गतीमान व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरला, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

000000000

सुधारित दौरा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, यांचा जळगाव जिल्हा दौरा

      जळगाव दि. 28 ( जिमाका वृत्तसेवा ) राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे.  -    बुधवार, दिनांक 28 मे, 2025 रात्री 08.25 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. रात्री 09.00 वाजता अजिंठा विश्रामगृह, कन्या रत्नावली चौक, जळगावकडे प्रयाण. रात्री 09.20 वाजता आगमन व राखीव

 गुरुवार, दिनांक 29 मे, 2025 सकाळी 07.50 वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथून राधाकिसनवाडी, विसानजीनगर, जळगावकडे प्रयाण. सकाळी 08.00 वाजता प्रदीप जैन (अध्यक्ष, खान्देश जिन प्रेस फैक्टरी ओनर्स अँड ट्रेडर्स डेव्हलपमेंट असोसिएशन) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी 08.30 वाजता आहुजा नगर कडे प्रयाण. सकाळी 08.40 वाजता योगेश देसले (जिल्हा कार्याध्यक्ष, जळगाव) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.  सकाळी 09.00 वाजता आहुजा नगर, जळगाव येथून स्टेशन रोड, अमळनेर, जि. जळगाव कडे प्रयाण. सकाळी 10.30 दि. अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. अमळनेर या बँकेच्या सन 2025-26 हे आर्थिक वर्ष "शतक महोत्सवी वर्ष" या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी भेट व राखीव. दुपारी 01.00 वाजता अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे विविध विकासकामांचे पायाभरणी समारंभ व स्वागत सत्कार समारंभ. दुपारी 01.30 वाजता जळगाव कडे प्रयाण. दुपारी 02.30 वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित या बँकेस भेट. दुपारी 03.00 वाजता छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण.

00000000000

खरीप २०२५-२६ : सोयाबीन पिकासाठी अनुदानित बियाणे वाटपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

       जळगाव दि. 28(जिमाका) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया मध्ये खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन पिकांचे अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत.

               याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या मथळ्या अंतर्गत बियाणे घटकामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या घटकासाठी अर्ज करावा.

              अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी /उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा व तरी जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

                                                              00000000000

वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा; जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट

             जळगाव, दि. 28 मे (जिमाका वृत्तसेवा) - प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. 28 मे 2025 रोजी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी येऱ्या चार तासात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सर्व यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारी:

1. विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घरातच राहावे. सुरक्षित निवारा नसल्यास सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे.

2. विजा चमकत असताना उघड्यावर, छतावर, गॅलरीत अथवा झाडाजवळ थांबू नये.

3. घरातील विद्युत उपकरणे

4. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये.

5. पाण्यात उभे असल्यास त्वरित कोरड्या जागी जावे.

टाळावयाच्या कृती:

1. विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शॉवर, नळ, पाईपलाइन किंवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर करू नये.

2. धातूच्या तंबूत अथवा शेडखाली आसरा घेऊ नये.

3. उंच झाडांखाली थांबू नये.

4. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळावे.

5. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून विजेचा प्रकाश पाहण्याचा मोह टाळावा.

जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकृत शासकीय सूत्रांकडूनच माहिती मिळवावी. आपत्कालीन स्थितीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले आहे.

                                                           000000000

Tuesday, 27 May 2025

"AMRUT अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी सुवर्णसंधी – NIELIT औरंगाबाद केंद्रात विविध कोर्सेस उपलब्ध"

             जळगाव, दि. २७ मे (जिमाका वृत्तसेवा) – औरंगाबाद (AMRUT) – महाराष्ट्र शासनाच्या शहरी भागातील युवक-युवतींसाठी केंद्र पुरस्कृत AMRUT योजनेअंतर्गत NIELIT संस्थेमार्फत वर्ष २०२५-२६ मध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण औरंगाबाद येथील NIELIT प्रशिक्षण केंद्रात घेतले जाणार आहे.

            यात ज्या खुल्या प्रवगातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकिय विभाग/ संस्था/ महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अश्या जातींना (ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कम्मा, कायस्थ, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, येलमार, त्यागी, सेनगूथर, बनिया, राजपुरोहित, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार) विद्यार्थी, विद्यार्थिनीसाठी केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिस आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या NIELIT या नामांकित प्रशिक्षण संस्थेद्वारे औद्योगिक व उत्रत कौशल्य विकासासाठी, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या मार्फत निशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. याकरिता इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनी कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत खालील प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे:

1. फाउंडेशन कोर्स इन इन्फर्मेशन सिक्युरिटी, 2. सायबर सिक्युरिटी असिस्टंट, 3. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट, 4. सर्टिफाईड वेब डेव्हलपर, 5. सर्टिफाईड डेटा अ‍ॅनालिस्ट, 6. फाउंडेशन कोर्स इन मशीन लर्निंग युजिंग पायथन, 7. डेटा अनालिसिस विथ पायथन अ‍ॅण्ड एसक्यूएल, 8. ड्रोन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर, 9. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) असिस्टंट, 10. फाउंडेशन कोर्स इन व्हीएलएसआय डिझाईन.

पात्रता: अर्जदाराने १२वी पास किंवा संबंधित तांत्रिक पदवी (IT/CS/Electronics/Electrical आदि) असावी. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा व लक्षित गटातील असावा. कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, जात व रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र/EWS प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र

अर्ज प्रक्रिया:

NIELIT संस्थेच्या संकेतस्थळावर अमृत प्रशिक्षण योजनेसाठी google link देण्यात येणार आहे. त्यावर इच्छुक प्रशिक्षणार्थी यांची नाव नोंदणी केली जाईल. लवअमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन आधार संलग्न मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी व संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील योजना या टॅबमध्ये जाऊन NIELIT प्रशिक्षण योजना हे बटनावर क्लि करून अर्जाची नोंदणी करावी.

प्रशिक्षण कालावधी व वेळापत्रक:

प्रशिक्षण जून २०२५ पासून सुरू होणार असून, विविध कोर्सेससाठी १५ ते ९० दिवसांपर्यंतचा कालावधी असणार आहे. दररोज ६ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरी भागातील तरुणांना नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी info@mahaamrut.org.in या ईमेलवर संपर्क साधावा किंवा ७३०१९६१९६५ या क्रमांकावर कॉल करावा.

००००००००००००

दुचाकी वाहनांकरिता नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस 02 जून पासून सुरुवात नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकांसाठी 28 व 29 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

              जळगाव दि. 27 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन  नोंदणी एमएच-19 /ईआर 0001 ते 9999 पर्यंतची मालिका  लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

              ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक  आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयात दिनांक 28 व 29 मे २०२५  रोजी अर्ज दुपारी ४.०० वाजेपर्यंत जमा करायची आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे, त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक असणार आहे.

             दिनांक 28 व 29 मे 2025  रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.  दिनांक 29 मे 2025 रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. दिनांक 29 मे रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 30 मे रोजी दुपारी  3 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

               बंद लिफाफे हे 30 मे रोजी 4.30 वाजता सहाय्यक /उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील असे जळगावचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००००००००००

महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील यांचा गौरव

             जळगाव, दि. २७ मे (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत प्रभावी अंमलबजावणीबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील, जिल्हा समन्वयक, महा-आयटी यांना राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला आहे.

            मुंबईस्थित राज्य लोक सेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते त्यांना सन 2022 ते 2025 या कालावधीत केलेल्या कार्यासाठी प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या गौरवप्रसंगी राज्य लोक सेवा हक्क आयोग, नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी, यांची विशेष उपस्थिती होती.

हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेली मान्यता आहे.

0000000000

Monday, 26 May 2025

महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीतील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील यांचा गौरव


       जळगाव, दि. २७ मे (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत प्रभावी अंमलबजावणीबाबत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जळगावचे श्री. स्वप्नील पाटील, जिल्हा समन्वयक, महा-आयटी यांना राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला आहे.

                               मुंबईस्थित राज्य लोक सेवा हक्क आयोगाचे आयुक्त श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांच्या शुभहस्ते त्यांना सन 2022 ते 2025 या कालावधीत केलेल्या कार्यासाठी प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या गौरवप्रसंगी

राज्य लोक सेवा हक्क आयोग, नाशिक विभागाच्या आयुक्त श्रीमती चित्रा कुलकर्णी, यांची विशेष उपस्थिती होती.

                               हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रयत्नांना प्राप्त झालेली मान्यता आहे.

००००००००००

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ▪ विविध योजनांच्या २४५ पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ












जळगाव, दि. २६ मे २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  मालदाभाडी (ता. जामनेर) येथील विठ्ठल मंदिर सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साही व लोकाभिमुख वातावरणात पार पडले. या शिबिरात २५ विभागांचे ३८ स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामार्फत एकूण २४५ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला.

                               या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार जामनेर श्री. नानासाहेब आगळे यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाले. यावेळी श्री. मयूर पाटील, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

                               महसूल विभागाच्या स्टॉलवर १३६ जणांना ७/१२ व ८अ उतारे वितरित करण्यात आले. जात व निवासी प्रमाणपत्रासाठी ४० लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. तसेच अंत्योदय, प्राकुला व नवीन शिधापत्रिका २७ लाभार्थ्यांना देण्यात आल्या, तर संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ १६ नागरिकांना मिळाला. पंचायत समिती विभागामार्फत २२, सामाजिक न्याय विभागामार्फत २ आणि कृषी विभागामार्फत २ लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली.

                               शिबिराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या, विभागीय समन्वयातून तत्काळ सेवा देण्यात आल्या आणि अनेक लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळाला. नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त करत प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

                               शासन आपल्या दारी या उपक्रमाला बळकटी देणाऱ्या या शिबिरात विविध विभागांचा प्रभावी सहभाग अनुकरणीय ठरल्याची माहिती जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले.

00000000000