जळगाव दि. २३ मे (जिमाका वृत्तसेवा):-जामनेर तालुक्यातील गारखेडा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात विविध विभागांच्या २५ विभागांचे एकूण ३८ स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसेच प्रत्यक्ष लाभही प्रदान करण्यात आले.
प्रांताधिकारी श्री. विनय गोसावी व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक लाभांचे वाटप करण्यात आले. शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, जिल्हा परिषद, सामाजिक बांधिलकी आणि वनविभाग यांसह अनेक विभाग सहभागी झाले होते.
शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंद्रकांत बाविस्कर, माजी जि.प. सदस्य श्री. विलास पाटील, श्री. मयूर पाटील, मा. मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन यांच्या स्वीय सहाय्यक श्री. दीपक तायडे, गारखेडा बु. व खु. येथील सरपंच, तसेच महसूल विभागातील श्री. प्रशांत निबोळकर, श्री. किशोर माळी, नायब तहसीलदार श्रीमती माया शिवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभागाच्या माध्यमातून १६५ लाभार्थींना ७/१२, ८अ, जात/निवासी प्रमाणपत्रे, शिधापत्रिका, संजय गांधी व श्रावणबाळ योजनांचे लाभ देण्यात आले. आरोग्य विभागाने ५५ नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य शिबिरात ४९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. कृषी व वनविभागाच्या स्टॉलवर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरामुळे ग्रामस्थांना शासकीय सेवा व योजनांचा एकाच ठिकाणी लाभ घेण्याची संधी मिळाली. अर्ज प्रक्रियेचा वेगाने निपटारा झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले.
0000000






No comments:
Post a Comment