Wednesday, 28 May 2025

प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा): - राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अधधान्य व वाणिज्यिक पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकऱ्यांना सुधारित व संकरीत वाणांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या माध्यमातून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविला जात असून, प्रति शेतकरी किमान 0.20 ते कमाल 1 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे.

            या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल व तीळ या पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या पोर्टलवर "बियाणे वितरण - प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक", "औषधे", व "खते" या टाईलखाली अर्ज करावा. प्रथम लाभार्थ्यांची यादी 30 जून 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे.

            याशिवाय भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी व वरई या पिकांसाठीही अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी 7/12 उतारा व कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला सादर करून अनुदान वजा दराने बियाणे खरेदी करावे.

            प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची "AgriStack" प्रणालीवर नोंदणी आवश्यक आहे. लाभार्थी निवड "First Come First Serve" (FCFS) तत्त्वावर होणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील तंत्र अधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

No comments:

Post a Comment