Tuesday, 20 February 2018

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत 58 पिडीतांना 54 लाख रुपयांचे अर्थसहाय मंजूर

         जळगाव, दि. २० - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली जिल्हयात गेल्या दहा महिन्यात घडलेल्या गुन्हयातील 58 अत्याचार पिडीतांना 53 लाख 88 हजार 250 रुपयांचे अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे.
        जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा निवासी उप जिल्हाधिकारी श्री. मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके, सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुराडे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. गायकवाड यांनी बैठकीत ही माहिती दिली.
        अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत डिसेंबर 2017 अखेर 16 गुन्हे पोलीस तपासावर आहेत. तर जानेवारी 2018 या महिन्यात 8 गुन्हे नव्याने दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांचा पोलीस तपास सुरु असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या कायद्यातंर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना श्री. मुंडके यांनी संबंधितांना दिल्यात.
                                                               000

No comments:

Post a Comment