Monday, 12 August 2024

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

                 जळगाव, दि. 12 ( जिमाका ) :- सोयाबीन पिकावर पिवळा मोझेइक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणत प्रादुर्भाव दिसून येतो जर यावर्षी कुठे आढळून आल्यास खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.

                        पिवळा मोझेंइकची लक्षणे (Yellow Mosaic Virus - YMV)-       रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे-छोटे चट्टे दिसतात, तद्नंतर पानावर चमकदार पिवळ्या हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात.  रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशीद्वारे होतो

                        सोयाबीन मोझेंइक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus – SMV):- या रोगाचा प्रादुर्भाव सद्याजरी दिसून आला नसला तरी भविष्यातील खबरदारी म्हणून या रोगाची लक्षणे व व्यवस्थापन- रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसुन येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होते.

       प्रतिबंधात्मक उपायः-

            सुरूवातीसच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावीत. पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

          नियंत्रणाचे उपाय:- पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

  

             रोग/किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

                        इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के डब्लुजी २ ग्रॅम किंवा थायोनियोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रिड २५ टक्के बायफेन्द्रीन २५ डब्लुजी ५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावीत           टिपः नियंत्रण उपायामधील रासायनिक किटकशाकांच्या शिफारसी ह्या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत,  असे तांत्रिक माहिती व सहकार्य डॉ. पं. दे. कृ.वि., अकोला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

००००००००००

No comments:

Post a Comment