Saturday, 19 October 2019

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त 35 तक्रारींचे निराकरण


            जळगाव, दि. 19 - विधानसभा निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरीकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या. नागरिकांना आदर्श आचारसंहितेचा  भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याविषयी तक्रार करण्यासाठी सी-व्हिजिल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवघ्या 100 मिनिटांत निराकरण करावे लागते.
            या ॲपवर नागरीकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सी- व्हिजिल कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकी दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी आचारसंहिता भंग विषयक सी- व्हिजिल ॲपवर 35 तक्रारी नोंदविल्या होत्या. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सी- व्हिजिल कक्षाच्या नोडल अधिकारी श्वेता संचेती यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात सी-व्हीजील ॲपवर अमळनेर विधानसभा मतदार संघात एक, भुसावळ दोन, चाळीसगाव चार, चोपडा तीन, एरंडोल निरंक, जळगाव शहर सात, जळगाव ग्रामीण एक, जामनेर एक, मुक्ताईनगर एक, पाचोरा तेरा, रावेर दोन अशा पस्तीस तक्रारी विधानसभा निवडणूकीची आदर्श आचार सहिंता लागू झाल्यापासून सी- व्हिजिल ॲपवर नोंदवल्या गेल्या होत्या. या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी ह्या पोस्टर्स, बॅनर्स याबाबत असल्याचेही श्रीमती संचेती यांनी कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment