Saturday, 12 October 2019

मतदानाची सर्वोच्च नोंद होणाऱ्या जिल्ह्यातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

जळगाव, दि. 12 - मतदानाच्या दिवशी ज्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर सर्वोच्च मतदानाची नोंद होईल. अशा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  यांनी केली आहे.
 त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदार चिठ्ठीचे 100 टक्के वाटप होईल यादृष्टीने नियोजन करण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठी 21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान होत आहे. या निवडणूकीमध्ये जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी यांनी हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सहभागी होऊन आपल्या मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment