Thursday, 17 October 2019

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न





            जळगाव, दि. 17 - निवडणूकीचे वार्तांकन करतांना माध्यम प्रतिनिधी व विश्लेषकांना मागील निवडणूकीचे संदर्भ उपलब्ध व्हावेत, याकरीता जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका-2019’ चे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले.
            याप्रसंगी निवडणुक निरीक्षक सर्व सर्वश्री. पार्थ सारथी मिश्रा, रूपक मुजूमदार, नरेंद्रसिंह पटेल, पुनीत गोयल, गौरव बोथरा, निवडणुक पोलिस निरीक्षक अहमद खुर्शीद, खर्च निरिक्षक हरीसन ॲन्टोनी, बिस्वनाथ दास, अनंथ आर, देवाशीष पॉल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, माहिती अधिकारी श्रीमती शैलजा पाटील यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.
            या पूर्वपिठीकेत जिल्ह्यातील  अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर या अकरा विधानसभा मतदार संघातील सन 1952 ते 2014 या कालावधीतील विजयी उमेदवार, मतदार संघाचे नकाशे, निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, मागील निवडणूकीतील उमेदवारांना विधानसभा मतदार संघनिहाय मिळालेली मते, निवडणूकीचा सविस्तर कार्यक्रम, आदर्श आचारसंहिता कालावधीत काय करावे, काय करू नये आदि विविध स्वरुपाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            ही पूर्वपीठिका निवडणूक विश्लेषक, राजकीय पक्ष व माध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रकाशनाप्रसंगी व्यक्त केले.
            या पूर्वपीठिकेची संकल्पना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची असून यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळेंसह निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ही पूर्वपीठिका निवडणूक विश्लेषकांसाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे उपलब्ध होईल. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली.
                                                        000

No comments:

Post a Comment