जळगाव, दि. 21 - शेतमाल निर्यातीचे विविध देशांमध्ये वेगवेगळे मापदंड आहेत.
शेतकऱ्यांनी आपण उत्पादित करीत असलेला शेतमाल कोणत्या देशात पाठवावयाचा आहे. त्या
देशात त्या शेतमालाचे असलेले मापदंड समजून घ्यावे. व त्यानुसार शेतमाल निर्यात
केल्यास मोठया प्रमाणावर शेतकरी बांधव यशस्वी निर्यातदार होतील. असा विश्वास विदेश
व्यापार संचालनालयाचे सहसंचालक डॉ. एस. के. बन्सल यांनी आज व्यक्त केला.
जिल्ह्यातील कृषि माल निर्यातीला चालना
मिळावी तसेच निर्यातदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे याकरीता जिल्हा अधिक्षक
कृषि कार्यालय, जळगाव, ॲग्रोवर्ल्ड, जळगाव आणि ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर
यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल निर्यात संधी कार्यशाळेचे जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवनात आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.
बन्सल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत
होते. याप्रसंगी व्यासपीठावर विदेश व्यापार संचालनालयाचे उपसंचालक संभाजी चव्हाण,
के. एम. हरिलाल, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजीराव आमले, कृषि उपसंचालक अनिल भोकरे,
ॲग्रोवर्ल्ड, जळगाव चे शैलेंद्र चव्हाण, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूरचे संतोष
डुकरे आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना
डॉ. बन्सल पुढे म्हणाले की, फळांच्या उत्पादनात आपल्या देशाचा जगात दुसरा क्रमांक
आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांनी शेतमाल निर्यात करताना येणाऱ्या अडचणी समजून
घ्याव्यात. तसेच शेतमालाची पॅकींग, वाहतुक आदि व्यवस्था चांगली ठेवल्यास त्यांच्या
मालाला विदेशात चांगली मागणी असते. यासाठी शेतकऱ्यांनी निर्यातीचे नियम, शासन
पुरवित असलेल्या सोईसुविधा आदिंची माहिती करुन घ्यावी. निर्यातदारांसाठी
शासनामार्फतही आवश्यक ते सहकार्य करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक श्री.
दिलीप झेंडे म्हणाले की, जळगावच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असून त्यांची
कार्यक्षमताही चांगली असल्याने त्यांनी आपली बलस्थाने ओळखून निर्यातक्षम शेतमालाचे
उत्पादन घ्यावे. जिल्ह्यातील शेतकरी विविध प्रकारची व चांगल्या दर्जाची पीके घेत
असल्याने त्यांना निर्यातीची मोठी संधी आहे. यासाठी या शेतकऱ्यांना कृषि
विभागामार्फत आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करण्यात येईल असे सांगून यशस्वी
निर्यातदार होऊ या चला डॉलर कमवू या याबाबतचा कानमंत्रही श्री. झेंडे यांनी शेतकऱ्यांना
दिला.
शेतमाल आयात निर्यात:सद्यस्थिती, धोरण
व संधी आणि आपेडाच्या निर्यातवृध्दीसाठीच्या योजनांवर मार्गदर्शन करतांना विदेश
व्यापार संचालनालयाचे उपसंचालक संभाजी चव्हाण म्हणाले की, देशाच्या
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी निर्यात वाढणे आवश्यक असते. निर्यातदार हे
अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल आयात
निर्यातीचे धोरण समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपेडामार्फत निर्यात वाढीसाठी
राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती करुन घ्यावी. सद्यस्थितीत विविध देशांमध्ये 3 कोटी अनिवासी
भारतीय रहातात. त्यांना आपल्या देशातील शेतमाल मिळणे अपेक्षित असते. शेतकऱ्यांनी
या सर्व बाबींचा विचार करुन आपल्या शेतमालाला कोणत्या देशात निर्यातीच्या संधी
आहे. याचा सारासार विचार करुन निर्यात करावी. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि
भारतीय व्यापार सद्यस्थिती, विदेश व्यापार धोरण, विदेश व्यापारातील संधी, विदेश
व्यापार प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय मालाची निर्यात,
आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाटा, विदेशी
व्यापार धोरण, विदेश व्यापार सुलभीकरण
Ease of Trading TIES (Trade
infrastructure for Export Scheme) योजनेव्दारे निर्यात पूरक पायाभूत सुविधा
उभारण्यावर भर, राज्याचे निर्यात धोरण, शुल्क सवलत, परतावा योजना ( Duty Exemption
/ Refund), निर्यात प्रोत्साहन भांडवल वस्तू (EPCG)
योजना, निर्यात प्रोत्साहन योजना MEIS (Merchandise Export incentive Scheme) आयात
निर्यात प्रक्रिया, संस्थेची नोंदणी, PAN
क्रमांक मिळवणे, बँक खाते काढणे, IEC क्रमांक मिळवणे, उत्पादन व बाजार निवड,
शेतमालाची किंमत ठरवणे, खरेदीदारसह बोलणी करणे, निर्यात प्रोत्साहन योजनेचा लाभ
आदि विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन व सादरीकरण केले.
तसेच जीएसटी व शेतमाल निर्यात, निर्यातीसाठीचे आर्थिक संरक्षण,
आर्थिक व्यवहार सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करतांना विदेश
व्यापार संचालनालयाचे उपसंचालक के. एम. हरिलाल म्हणाले की, कोणतीही वस्तु निर्यात
करण्यासाठी जीएसटी क्रमांक आवश्यक आहे. तसेच पॅनकार्ड, दरवर्षी जीएसटी रिटर्न फाईल
सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय निर्यातदार शेतकऱ्यांना निर्यातीसाठीचे आर्थिक
संरक्षण होत नाही. त्याचबरोबर आर्थिक व्यवहाराला सुरक्षा मिळत नाही. याबाबतचे
तांत्रिक मार्गदर्शनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक
सोनवणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या
हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲग्रोव्हिजन
फाउंडेशन, नागपूरचे संतोष डुकरे यांनी केले.
दुपारच्या
सत्रात कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी व्हेज नेट/ अनार नेट कार्यप्रणालीवर तर
आत्मा चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांनी निर्यातक्षम फार्मर्स प्रोडयुसर कंपनी
कार्यप्रणालीवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार ॲग्रोवर्ल्ड चे
शैलेंद्र चव्हाण यांनी मानले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील कृषिक्षेत्रात
नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी
जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी जीआय मानांकन प्राप्त भरताचे वांगे,
निर्यातक्षम भेंडी, ढोबळी मिरची देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
000
No comments:
Post a Comment