Tuesday, 21 June 2022

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करणेबाबत

       जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.21- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) जळगाव जिल्ह्यातील समाविष्ट 460 गावातील शेतकऱ्यांकरीता हवामान अनुकूल कृषी पध्दती या घटकांतर्गत मुलस्थानी जलसंधारण या उपघटकामध्ये रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन ही बाब समाविष्ट करण्यात आली आहे. तरी प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांनी नोंदणीकृत बीबीएफ यंत्र धारकाकडुन पेरणी करुन घेतल्यास प्रति शेतकरी कमाल 2 हे. मर्यादेपर्यंत किंवा गावातील जास्तीजास्त 25 शेतकऱ्यांना कमाल मर्यादा रक्कम रु. 1 हजार प्रति हे. किंवा रु. 400 प्रति एकर दराने प्रोत्साहनपर अनुदान डिबीटी – पोक्रा या ऑनलाईन पोर्टलव्दारे देय केले जाणार आहे.

          शेती ही मुख्यत: कोरडवाहू असल्याने रुंद वाफा व सरी (बीबीएफ) टोकन यंत्राचा वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. या यंत्राव्दारे पेरणी केल्यास कमी पावसात सरीमध्ये पाणी साठवून पिकांसाठी ओलावा  निर्माण होतो आणि अधिक पावसाच्या कालावधीत अधिक पाण्याचा निचरा शेताबाहेर सुरक्षितरीत्या केला जातो. उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते. आंतरपीक पध्दतीचा अवलंब करुन अधिकचे उत्पन्न्‍ मिळते. पावसात खंड पडल्यास  किंवा पाणी कमी असल्यास या पध्दतीमुळे वरंब्यांवर ओलावा टिकवून ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. पाऊस जास्त झाल्यास या पध्दतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते. मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पेरणीसाठी बियाणे कमी लागते, पाण्याची बचत होते, उत्पनामध्ये हमखास वाढ होते. पिकाची आंतरमशागत, औषध फवारणी, स्प्रिंकलव्दारे संरक्षित पाणी  देण्यासाठी ही पेरणी पध्दत फायदेशीर ठरते.

          तरी प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावातील शेतकरी बांधवांनी जास्तीतजास्त बीबीएफ यंत्राव्दारे पेरणी करुन प्रकल्पांतर्गत देय असलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घ्यावा, अधिक माहिती करीता संबंधित गावाचे कृषी सहाय्यक समुह सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment