Monday, 15 April 2019

जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभागाची 19 कोटी रुपयांची विक्रमी वसुली

         जळगाव, दि. 15 - जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र यंत्रणेने सन 2018-19 या वर्षात वजनेमापे उपयोगकर्त्यांकडून वजने मापे परवाने शुल्क पडताळणी, मुद्रांकन व प्रशमनपोटी 18 कोटी 99 लाख 10 हजार 944 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती श्री. रा. भ. बांगर सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी दिली आहे. तसेच प्रशमन वसुली व आवेस्टीत वस्तू खटले नोंदणीमध्ये जळगाव जिल्हा नाशिक विभागात आघाडीवर असून वजने मापे उपयोगकर्त्यांकडून वजने मापे पडताळणी करण्यामध्ये जिल्ह्याने व्दितीय स्थान पटकाविले आहे.
     सन 2018-2019 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला वजने मापे उपयोगकर्त्यांकडून वजने मापे पडताळणी व मुद्राकन वसुलीचे 1.73 कोटी रुपयांचे लक्ष निर्धारित करण्यात आलेले होते. त्यापोटी विभागास 1 कोटी 80 लाख 83 हजार 644 इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे. वजने मापे खटले व आवेस्टीत वस्तू नियम खटल्यांमध्ये 13.50 लाख रुपयांचे लक्ष असताना 16 लाख 28 हजार 300 रुपये वजने मापे उल्लंघनाच्या एकूण 323 खटले तर आवेस्टीत वस्तूचे 209 खटले नोंदविण्यात आले आहेत. वर्षभरात न्यायालयात एकूण 7 खटले निकाली लागले असून संबंधितांनी न्यायालयात एकूण 33 हजार रुपये रक्कम जमा केली आहे. तर वजने मापे दुरुस्ती व विक्री परवान्यांपोटी 1 लाख 99 हजार रुपये प्राप्त झाले आहे.
विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन
     विभागाने सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्यामुळे वजने मापे उपयोगकर्त्यांना कार्यालयात वारंवार न येता परवाने शुल्क पडताळणी व मुद्रांकन फी प्रशमन रक्कम  https://gras.mahakosh.gov.in/echallan/frmindex.pho  या पोर्टलवर घरी बसून भरता येणे शक्य झाले आहे.
     आठवडे बाजारातील वजने मापे उपयोगकर्ते, कापूस खरेदीसाठी वापरात येणारे वजने मापे तसेच केळी खरेदीसाठी वापरात येणारी वजने मापे व इतर सर्व संबधितांनीही आपले सर्व वापरावयाची वजने मापे आपल्या जवळच्या निरीक्षक वैध मापन शस्त्र कार्यालयातून फेरतपासणी व मुद्रांकन करुन घ्यावी, आवेस्टीत वस्तू विक्री करणारे किरकोळ विक्रेते, आवेस्टक, उत्पादक, व आयातदार यांनी आवेस्टीत वस्तूंवर आवश्यक असणा-या घोषणा नियमाप्रमाणे असतील याची दक्षता घ्यावी. किरकोळ विक्रेते यांनी आवेस्टीत वस्तूंची ‍विक्री घोषीत एमआरपीपेक्षा जास्त भावाने करु नये असे आवाहन श्री. बांगर यांनी केले आहे.                    
     वजने मापे व आवेस्टीत वस्तूंबाबत काही अडचणी/शंका असल्यास किंवा  तक्रारी असल्यास दूरध्वनी क्र. 2241149 वर अथवा aclmjalgaon@yahoo.in  या इमेलवर अथवा http://www.vaidhmapan.maharashtra.gov.in:443/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. रा. भ. बांगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                       000

No comments:

Post a Comment