Monday, 15 April 2019

निवडणूक खर्च निरीक्षकांनी तपासल्या उमेदवारांच्या हिशोब नोंदवह्या





          जळगाव, दि. 15:- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक खर्च निरिक्षकांनी आज उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोब नोंदवह्या तपासल्या.
          येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये जळगांव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक वेणूधर गोडेसी आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक मधुकर आंनद यांच्या उपस्थितीत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब नोंदवही (शॅडो रजिस्टर) ची दुसरी तपासणी आज करण्यात आली.
        यावेळी निवडणूक खर्च नियंत्रण व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडित, माध्यम प्रमाणीकरण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी तुषार चिनावलकर, डी.बी.बेहरे, विनोद चावरीया, लेखाधिकारी श्री. देशमुख, पी.पी.महाजन, पी.पी.सोनवणे, विलास पाटील, कपील पवार यांच्यासह निवडणूक खर्च शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  
       यावेळी निवडणूक खर्च निरिक्षक यांनी उमेदवारनिहाय उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून खर्चाच्या हिशोब नोंदवह्या, बँकेचे पासबुक, रोखीने करण्यात आलेला दैनंदिन आर्थिक व्यवहार, खर्चाचा ताळमेळ करतांना दाखविण्यात आलेली बीले, आदिची तपासणी केली. त्याचबरोबर निवडणूक खर्च शाखेकडे सादर केलेल्या बीलांचा ताळमेळ, जाहिरात प्रमाणीकरण समितीने सादर केलेले खर्चाचे विवरण उमेदवारांनी त्यांच्या खर्चात दाखविले किंवा कसे याचीही पडताळणी केली. तसेच पेडन्युजबाबतचीही माहिती जाणून घेतली. या तपासणीमध्ये ज्या उमेदवारांच्या हिशोब नोंदवहीमध्ये तफावत आढळेल त्यांना नोटीसा देण्याचे निर्देश  निवडणूक खर्च निरिक्षकांनी यावेळी संबंधितांना दिले.
       यापुढील तिसरी तपासणी 20 एप्रिल, 2019 रोजी करण्यात येणार असल्याचे निवडणूक खर्च निरिक्षक यांनी सांगितले.
                                                                         00000

No comments:

Post a Comment