Tuesday, 23 April 2019

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान















            जळगांव, दि. 23- जिल्ह्यातील 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात  किरकोळ अपवाद वगळता सुरळीत व शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 03-जळगाव लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.24 टक्के तर 04-रावेर लोकसभा मतदार संघ 56.83 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
            जिल्ह्यात जळगाव लोकसभेसाठी 14 तर रावेर लोकसभेसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. सुलभ निवडणूक हे ब्रीद घेऊन निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांना विशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान केल्याने जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
            जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील 3617 मतदार केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर पाळणाघराची देखील व्यवस्था करण्यात आली होती. तर काही ठिकाणी पालकांसोबत मतदान केंद्रावर आलेल्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी खेळणी व खाऊचीही व्यवस्था करण्यात आली होती. पाळणाघरात अंगणवाडी सेविका लहान मुलांची काळजी घेत होत्या.
            निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघातील 12 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. एरंडोल येथील आदर्श मतदान केंद्रावर मतदारांचे ढोल वाजवून स्वागत करण्यात येत होते. या मतदान केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी फेटे घातले होते. अनेक ठिकाणी मतदारांचे औक्षणही करण्यात आले. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र तयार करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, शौचालयाची व वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आली होती.
            या निवडणूकीत मतदान यंत्राला प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत असल्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर  बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. निवडणूकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त  ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत होते. 
            04-रावेर लोकसभा मतदार संघातही आज सकाळपासूनच प्रथमच मतदान करीत असलेल्या  तरुण, तरुणीमध्ये उत्साह जाणवत होता. पाडळसे या गावातील बीएससी  तृतीय वर्षात शिकणारी कु. धनश्री पाटील हिने प्रथम मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. मतदानानंतर तीने सांगितले की, मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचा आपला प्रयत्न आहे. मतदानामुळे देशाच्या विकासबरोबरच आपला विकास साध्य करता येईल. आजच्या मतदानांसाठी ज्या ज्या तरुण तरुणांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. अशा सर्व तरुणांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्याचा संदेशही तीने दिला.
             रावेर लोकसभा मतदार संघात अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात भुसावळ येथील नगर पालीका शाळा, पाडळसे जिल्हा परिषद शाळा, विवेर खुर्द, फैजपूर, रावेर येथील सरदार जी जी प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय व मुक्ताईनगर येथे मतदारांमध्ये मतदानासाठी मोठया प्रमाणात उत्साह दिसत होता. पाडळसे येथील 90 वर्षाच्या सुमनबाई मुरलीधर भारंबे या आजीने कोणाचीही मदत न घेता मतदान केंद्रात येवून उत्साहात मतदान करुन आजच्या तरुण पिढीला मतदानासाठी प्रोत्साहन दिले. 87 वर्षाच्या द्वारकाबाई या महिलेला चालता येत नसल्याने त्यांनी आपल्या नातवाच्या मदतीने  आपला मतदानाचा हक्क बाजवला. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमण्यात आले होते. ते मतदारांचे जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिला मतदारांना स्वयंस्फुतीने मदत करतांना दिसत होते.   
03-जळगाव लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत  52.24 टक्के मतदान
जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात -45.48% ,जळगाव ग्रामीण -56.36%, अमळनेर-49.77%,पारोळा-एरंडोल-55.76%, चाळीसगाव-53.89%, पाचोरा-भडगाव-53.94%.
        04-रावेर लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.83 टक्के मतदान
चोपडा - 57.14%, रावेर-यावल- 62.01%,भुसावळ- 48.87%, जामनेर- 55.07%, मुक्ताईनगर- 57.56 %, मलकापूर - 60.99 % याप्रमाणे मतदान झाले आहे.
000

No comments:

Post a Comment