जळगाव,
दि. 01 - भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही असून लोकशाही बळकट करण्यासाठी
विद्यार्थ्यांनी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या
निवडणूकीत मतदान करण्यासाठी आपले पालक, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना प्रेरीत करण्याचा
संकल्प करावा व त्यांचेकडून संकल्पपत्र भरुन घ्यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक
पात्र मतदाराने कर्तव्य भावनेने आपला मतदानाचा हक्क बजवावा. असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज केले.
जिल्हा
प्रशासनाच्यावतीने ‘स्विप’ कार्यक्रमांतर्गत येथील शिवतीर्थ मैदानावर आयोजित मतदार
जनजागृती कार्यक्रमातंर्गत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी तथा 04-रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष
गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. तुकाराम हुलवळे, शिक्षणाधिकारी
(माध्यमिक) देविदास महाजन, गट विकास अधिकारी श्री. सोनवणे, गट शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण यांचेसह अनेक मान्यवर
उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते प्रचार रॅलीस हिरवी झेंडी दाखवून
रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ.
ढाकणे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे दूत बनून पालकांना व शेजारील
मतदारांना मतदानास येण्याचा आग्रह धरावा. जिल्ह्यात मोठया प्रमाणात मतदान
होण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. देश घडविण्यासाठी प्रत्येकाने मतदान
करणे गरजेचे आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला महत्व असल्याने कोणत्याही प्रलोभनाला
आणि दबावाला बळी न पडता नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. कोणताच
पात्र मतदार मतदान करण्यापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार
जागृतीत घेतलेला सहभाग इतरांनाही प्रेरित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थ्यांना
संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले.
मतदार
जनजागृती प्रचार फेरीत रावसाहेब रुपचंद विद्यालय, नंदीनीबाई वामनराव मुलींचे
विद्यालय, ला.ना. विद्यालय, गोपाळराव गुळवे विद्यालय, प. न. लुंकड विद्यालय, के.
के. उर्दू, ॲग्लो उर्दू, आदर्श विद्यालय आदि विद्यालयातील विद्यार्थी,
विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रचार फेरीचा शहरातील प्रमुख
रस्त्यांवरुन शास्त्री टॉवर, जुने बसस्थानक, चित्रा चौक या मार्गाने येऊन
शिवतीर्थावर समारोप करण्यात आला. यावेळी दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या कलापथकाने
मतदार जनजागृतीपर पथनाटय सादर केले.
०००
No comments:
Post a Comment