Saturday, 2 November 2019

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


            जळगाव. दि. 2- शासनातर्फे सामूहिक/नोंदणीकृत विवाह करणाऱ्या शेतकरी/शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते.  सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यास 2 हजार रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान विवाहाचा खर्च भागविण्यासाठी  देण्यात येते.
            या योजनेचा लाभ मिळण्यासाठी वधु जळगाव जिल्ह्याची स्थानिक रहिवाशी असावी, शेतकरी असल्यास 7/12 चा उतारा व शेतमजूर असल्यास भूमिहिन शेतमजूर असल्याचा दाखला आवश्यक, वधुच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसल्याचा दाखला, नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सामूहिक विवाह अथवा सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जावून नोंदणीकृत विवाह करणारे जोडपे
            बाल विवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्याचा भंग न केल्याबाबतचे विहीत नमुन्यात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र, सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत एका स्वयंसेवी संस्थेस एका सोहळ्यात किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश्‍ करण्याची परवानगी राहिल.
            शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेची माहिती शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा dwcwjal@gmail.com या मेल आयडीवर किंवा 0257-2228828 या दुरध्वनीवर संपर्क साधवा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment