जळगाव, दि. 30 - जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण
विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त
नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे
यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीची माहिती
देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.
चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय
पहुरकर, कार्यक्रम सहाय्यक गिरीश गडे, माध्यमांचे व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
एड्स नियंत्रण व प्रतिबंधक अभियानाचे कार्य अधिक प्रभावीपणे
जनतेपर्यंत पोहचण्यासाठी 1 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हा सामान्य
रुग्णालयापासून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभातफेरीचे उद्घाटन
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या होणार असून त्याप्रसंगी जिल्हा सामान्य
रुग्णालयाच्या आवारात पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानातंर्गत जिल्हा पोलीस मुख्यालयात 2 डिसेंबर रोजी
दुपारी 4.00 वाजता मार्गदर्शन व पोस्टर
प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात एचआयव्हीबाबत मार्गदर्शन व एैच्छिक
तपासणी करणे आणि आयईसी साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जळगाव रेल्वे
स्थानक व बसस्थानक येथे सकाळी 10 वाजता पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शन व आयईसी
साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 5 ते 31
डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील 60 महाविद्यालयात स्थापित असलेल्या रेडरिबिन
क्लबद्वारे युवकांमध्ये पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, चित्रफित दाखवून जिल्ह्यातील
23 आयसीटीसी केंद्राद्वारे युवकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे.
त्याचबरोबर 10 ते 31 डिसेंबर या कालावधीत दिशा समाजप्रबोधन संस्था, कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण
विभाग यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा आयोजित
करण्यात येणार आहे.
दिनांक 9 डिसेंबर
रोजी दुपारी 4.00 वाजता संगीत सभागृह, भास्कर मार्केट जवळ, जळगाव येथे आणि 10 डिसेंबर रोजी जिल्हा उद्दोग केंद्र, भुसावळ येथे पोस्टर प्रदर्शन,
लघुपट आणि व्याखानाचे तर दुपारी 2.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव येथेही पोस्टर
पदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधार संस्था, अमळनेर तर्फे 10 ते 14
डिसेंबर दरम्यान अमळनेर, पाचोरा, चोपडा तालुक्यांतील देह विक्रय करणाऱ्या
भगिनीकरिता, भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
एमएसएम (पुरुष, पुरुषांमध्ये लैंगिक संबध) मेळाव्यांतर्गत
गोदावरी फाऊंडेशन, लुंकड मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट
इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन व 13 डिसेंबर रोजी डिआयसी केंद्र, भुसावळ येथे सायंकाळी
4.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रविकास संस्था, जळगाव यांचेमार्फत 16 डिसेंबर रोजी
सकाळी 11.00 वाजता एमआयडीसी, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप, लघुपट,
व्याख्याने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ट्रक चालक व वाहक तसेच
निगडीत कर्मचारी यांच्या मेळाव्यांतर्गत 5 ते 20 डिसेबर दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर
व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यावर पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप व
व्याख्याने देवून उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागांमध्ये 100 गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर, विविध
मंडळे यांचे माध्यमांद्वारे ग्रामीण जनतेमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृतीपर
कार्यक्रम लिंक वर्कर (क्षेत्रीय कार्यकर्ते) आधार संस्था, अमळनेर यांचेमार्फत
करण्यात येणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी या अभियानात स्वयंस्फुर्तीने आपला
सहभाग नोंदवून जिल्हा एड्स, टीबी मुक्त करण्यास सहकार्य करावे. तसेच नागरीकांनीही
मनात करसलीही भिती न बाळगता आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ. बेडसे यांनी केले
याप्रसंगी केले.
जिल्हा एकात्मिक सल्ला व चाचणी (ICTC) केंद्राद्वारे एप्रिल
ते ऑक्टोबर, 2019 दरम्यान 66 हजार 136 सर्वसामान्य नागरीकांची मोफत एचआयव्हीची
तपासणी करण्यात आली आहे. या चाचणीत 326 व्यवक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत.
तर 32 हजार 225 गरोदर मातांच्या तपासणीत 25 गरोदर माता एचआव्ही संसर्गिंत आढळलया
आहेत. याप्रमाणे या कालावधीत जिल्ह्यात 351 व्यक्ती संसर्गित आढळून आल्याचे
कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात जळगाव व अमळनेर येथे प्रत्येकी 1 असे दोन आशा केंद्र
कार्यान्वीत आहेत. एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तींना संधीसाधू आजार हाऊ नये व आरोग्य
सुदृढ राहण्याच्या उद्देशाने रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी ओैषधी सामान्य
रुग्णालय, जळगाव येथे विनामुल्य दिली जातात. एप्रिल 2007 ते ऑक्टोंबर 2019 दरम्यान
नोंदणीकृत 8 हजार 665 पुरूष रुग्णांपैकी 7 हजार 264 एवढे प्रत्यक्षात औषधी घेत
आहेत. तर नोंदणीकृत महिला रुग्ण 5 हजार 75 एवढे असून प्रत्यक्षात औषध घेणाऱ्या
महिला रुग्णांची संख्या 1 हजार 924 इतकी आहेत. तर 748 मुलं-मुली रुग्ण नोंदणीकृत
असून त्यापैकी 160 मुलं प्रत्यक्षात औषध घेतात. असे एकूण 14 हजार 507 रुग्णांपैकी
प्रत्यक्षात 9 हजार 345 रुग्णच औषधी घेत आहे.
जिल्ह्यात सन 2019-2020 मध्ये 76 हजार 303 गरोदर मातांची
चाचणी केली असता त्यातील 24 गरोदर माता संसर्गिक आढळून आल्यात. तर सामान्य जनतेतून
1 लाख 5 हजार 992 नागरीकांची चाचणी केली असता त्यातून 326 रुग्ण संसर्गिक असल्याचे
आढळून आले आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 295 नागरीकांपैकी 350
रुग्ण संसर्गिक आढळून आले आहेत. जिल्ह्यात सन 2007-08 मध्ये संसर्गित व्यक्ती
आढळून येण्याचे प्रमाण हे 5.57 टक्के इतके होते. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण
विभागामार्फत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे व औषधोपचारामुळे हे प्रमाण 2019-20 मध्ये
0.19 टक्क्यांवर आले असल्याचेही कार्यक्रम अधिकारी श्री. पहुरकर यांनी यावेळी
सांगितले.
000
No comments:
Post a Comment