जळगाव, दि. 30 - रावेर लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेने वेग घेतला असून नुकतेच निवडणूक कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहेत. याठिकाणी आज निवडणूक खर्च निरीक्षक एम. आनंद यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी निवडणूक खर्च निरिक्षक एम. आंनद यांनी सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी हितगुज करतांना सांगितले की, लोकशाही बळकट करणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका या निकोप आणि पारदर्शक व्हाव्यात. यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी आलेले प्रचारक व कार्यकर्ते यांच्या सभा, प्रचारफेरी यांचे चित्रीकरण कसे करावे. याचे सविस्तर विवरण त्यांनी स्पष्ट करुन सांगितले.
उमेदवारांच्या निवडणूकी संबंधातील प्रत्येक खर्चावर आपले बारीक लक्ष असणे आवश्यक आहे. यासाठी व्हिडीओ चित्रीकरण व्यवस्थित होणे आवश्यक असून व्हिडीओ संनियंत्रण पथकांनी सजग राहणे आवश्यक आहे. तसेच स्थिर संनियंत्रण पथक यांनी इंटेलिजन्स शेअरिंगचे काम करावे. निवडणूकीत प्रत्येक उमेदवार करीत असलेला खर्च व पुढील कालावधीत होणारा खर्चाच्या हिशोबाबद्दल सहाय्यक खर्च निरिक्षक, व्हिडीओ संनिरिक्षक चमू, व्हिडीओ पाहणारा चमू, सेखांकन चमू, भरारी पथके तसेच स्थिर निरिक्षण चमू या सर्वांना मार्गदर्शन करून उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकता भासल्यास कडक कारवाई करण्याबाबत सुचना देखील त्यांनी केल्यात. निवडणूक कामासाठी नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे मनोगत व समस्या जाणून घेतानाच निवडणूक खर्च निरिक्षकांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व जबाबदारी याचीही जाणीव करुन दिली. जे अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करतील. त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही एम. आनंद यांनी दिला.
रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक एम.आनंद यांनी सहायक निवडणूक अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडून रावेर विधानसभा क्षेत्रामधील निवडणूक कामाचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीसंबंधी सुरु असलेले कामकाज बघून समाधान व्यक्त केले. यावेळी सहा निवडणूक खर्च निरीक्षक संजीत कुमार, रावेरच्या तहसीलदार अभिलाषा देवगुणे, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्यासह सर्व पथकातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000