Saturday, 2 March 2019

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीवेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


  जळगाव, दि. 2 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी जळगाव जिल्ह्याकरिता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र प्राप्त झाले आहेत. या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First Level Cheking) 2 मार्च, 2019 पासून तहसिल कार्यालय, भुसावळ आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लि. बेंगलोर येथील अभियंत्यांमार्फत सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
            मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी        (First Level Cheking) करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित ठेवणेबाबत सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले) यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First Level Cheking) च्या वेळी तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारात उपस्थित राहता येणार आहे. 
  गोदाम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोदामात प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या चाचणीस सामोरे जावे लागणार आहे. तसेच गोदामात कुठल्याही प्रकारच्या ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाता येणार नाही. मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणी (First Level Cheking) चे व्हीडीओ चित्रीकरण तसेच सी.सी.टी.व्ही व्दारे देखील चित्रण केले जाणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
                                                                    ०००

No comments:

Post a Comment