Friday, 8 March 2019

जिल्ह्यातील 245 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भुमीपूजन व उद्घाटन संपन्न




            जळगाव, दि. 8 - जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर टाकणाऱ्या 245 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे ई-भुमीपूजन, लोकार्पण उद्घाटन राज्याचे महसुल, मदत पुनर्वसन सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
            येथील जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर या जिल्ह्यातील विविध विकास कामांचे पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते कळ दाबून ई-भुमीपूजन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे जलसंपदा वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन, राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गुरुमुख जगवाणी, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, महापौर सिमाताई भोळे, माजीमंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदि उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात 4 कोटी 75 लाख 76 हजार रुपये खर्चून अल्पसंख्यांक समाजातील शंभर मुलींसाठी बांधलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन. यावल येथे 2 कोटी 53 लाख 988 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, हायब्रीड ॲन्युटी अतंर्गत यावल तालुक्यातील हरिपुरा यावल बोरावल टाकरखेडा शेळगाव कळगाव भादली आसोदा जळगाव या 20.10 किलोमीटर लांबीच्या रस्ताची सुधारणा करण्याच्या 74.76 कोटी रुपयांच्या कामांचे भुमिपूजन, किनगाव पाल खिरोदा सावदा आमोदा रस्त्याची ॲन्युटी अंतर्गत दुरूस्ती करण्याच्या 84.57 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन तर खिरोदा फैजपूर रोझोदा चिनावल विवरा कुसुंबा ते प्रजिमा-1 रस्त्याची 4 कोटी 70 लाख 61 हजार रुपये खर्चून सुधारणा करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मोर नदीवरील पिळोदा येथे 20.42 कोटी रुपये अंजाळे येथे 53.09 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उंच पुलांचे ई-भुमीपूजन पालकमंत्री ना. पाटील जलसंपदामंत्री ना. महाजन यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले.
सर्वांसाठी घरे 2022 योजनेतंर्गत
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकास पालकमंत्र्यांच्या हस्ते जमिनीची कागदपत्रे सुपूर्द
           प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी घरे-2022 या योजनेतून देशातील पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना घरे उपलब्ध होण्याकरीता घरे बांधण्यासाठी जागेची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. पात्र लाभार्थ्यांस हक्काचे घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शासकीय जमिनीवरील मागील काळातील अतिक्रमणे कायम करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना शासकीय जमिनीवर घरे बांधता येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारक श्री. सिताराम ठाकरे यांची अतिक्रमीत जागा नियमित करण्यात आली आहे. शासकीय जमीन नियमित करण्याच्या या योजनेचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरलेले श्री. ठाकरे यांना या जागेची कागदपत्रे आज पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
            या कार्यक्रमास आमदार स्मिताताई वाघ, संजय सावकारे, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे यांचेसह सार्वजनिक बांधकाम जलसंपदा इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment