जळगाव, दि. 13 - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. तसेच भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील आदेशानुसार निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी जळगाव जिल्हा हद्दीतील शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशन येथे जमा करणे आवश्यक आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे छाननी समितीची बैठक जिल्हादंडाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 च्या कालावधीत (निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून ते निवडणूकीच्या निकालापर्यत) जामिनावर मुक्त झालेले शस्त्र परवानाधारक, गुन्हे दाखल असलेले शस्त्र परवानाधारक, कोणत्याही वेळी व खास करुन निवडणुक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेले शस्त्र परवानाधारक या तीन वर्गवारीतील शस्त्र परवानाधारकांकडे असलेले शस्त्र तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी शस्त्र जमा करण्याची शिफारस केलेल्या 555 व्यक्तीकडील (विशेष सुट असलेली शस्त्रे तसेच बँका, विशेष सुरक्षा प्राप्त प्रतिष्ठानांकडे असलेली शस्त्रे वगळून) शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी पोलीस दलास दिले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक– 2019 च्या निकालानंतर 8 दिवसात सदर जमा करण्यात आलेली शस्त्रे संबंधितांना परत करण्याचेही डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.
०००
No comments:
Post a Comment