जळगाव,
दि. 19 - मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत
प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान करावे व आपली जबाबदारी
पार पाडावी. तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी सर्व
यंत्रणांनी सांघिक प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
आगामी
लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारामध्ये जनजागृती
होण्यासाठी करावयाच्या उपायायोजनांबाबतचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या
जिल्हास्तरीय स्वीप (SVEEP) कोअर समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस महानगरपालिकेचे
आयुक्त् डॉ. उदय टेकाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय
मस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा सुचना अधिकारी प्रमोद
बोरोले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक श्री. मगर, शिक्षणाधिकारी
(माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा प्रशासन
अधिकारी, नगरपालिका प्रशासन श्री. कुटे, आकाशवाणी केंद्राचे श्री. सपकाळे, नेहरु
युवा केद्रांचे समन्वयक श्री. पंजे यांचेसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना डॉ. ढाकणे म्हणाले की, निवडणूकांमध्ये सर्वसाधारणपणे ग्रामीण भागापेक्षा
शहरी भागात मतदानाचा टक्केवारी कमी असते.
त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. याकरीता सर्व यंत्रणांनी मतदारांमध्ये जनजागृती
करणे आवश्यक आहे. विशेषत: तरुण नवमतदार, महिला यांचे मतदान वाढणेकरीता
महानगरपालिकेने शहरी भागात तर जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात मतदार जनजागृती मोहिम
व्यापक प्रमाणात राबवून मतदारांना आवाहन करणे आवश्यक आहे. मतदारांच्या अडीअडचणी
सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या 1950 या
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात यावे. त्याचबरोबर
मागील निवडणूकांमध्ये ज्या मतदान केंद्रावर 10 टक्के व 50 टक्क्यांच्या आत मतदान
झाले आहे. अशा मतदान केंद्रांची यादी तयार करुन या मतदान केंद्रावर चुनाव
पाठशालेच्या माध्यमातून जनजागृती करणे, महाविद्यालयांमधील कॅम्पस ॲम्बेसेडर यांना
प्रोत्साहन देणे, निवडणूक साक्षरता मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करावी.
मतदानाच्या अगोदर सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी पोहोच करण्यात यावी. त्याचबरोबर
मतदान करण्यासाठी नोकरी करणारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही
त्यांनी केले. त्याचप्रमाणे मतदान
वाढीसाठी पालकांकडून भरुन घेण्यासाठी संकल्प पत्र विद्यार्थ्याकडे देण्यात येणार
आहे. तसेच अशा मतदान केंद्रावर काही सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहनही त्यांनी
केले.
विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श व एक महिला
मतदान केंद्र तयार करणार
निवडणूक
आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक
आदर्श व एक महिला मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर
सर्व कर्मचारी हे महिला असतील. तर आदर्श मतदान केंद्राची इमारत, फर्निचरबरोबरच
मतदानाविषयीच्या सुचना, चिन्ह, खुणा व लोगो हे डिसप्ले बोर्डवर दाखविण्यात येणार
आहे. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक, मतदारांना आवश्यक असलेल्या
वीज, पाणी, शौचालय, प्रथमोपचार पेटी, व्हीलचेअर, मतदान केंद्रावर गर्दी असल्यास
मतदारांसाठी प्रतिक्षाकक्ष, तान्हाबाळांसाठी पाळणाघर, सेल्फी पाँईट, मतदान
केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकसारखा युनिफॉर्म (ड्रेसकोड), मतदारांच्या
प्रतिक्रिया नोंदणी फॉर्म आदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी विविध
सेवाभावी सामाजिक संस्था, स्काऊट गाईडची मुले, व स्वयंसेवकांची मदत घेणार
असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
000
No comments:
Post a Comment