Monday, 11 March 2019

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे




- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी होणार मतदान
याबाबतची अधिसूचना 28 मार्च, 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 4 एप्रिल, तर छाननी 5 एप्रिल रोजी होणार
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल असणार
मंगळवार, 23 एप्रिल, 2019 रोजी होणार मतदान, तर गुरुवार, 23 मे, 2019 रोजी होणार मतमोजणी
लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याकरीता 8 हजार 17 बॅलेट युनिट, 4 हजार 583 कंट्रोल युनिट तर 4 हजार 927 व्हीव्हीपॅट मशीन उपलबध
निवडणूकीसाठी जिल्ह्यात 32 हजार 529 इतके मनुष्यबळ उपलब्ध
जिल्ह्यातील 28 मतदान केंद्र क्रिटीकल तर 40 मतदान केंद्र सामाजिकदृष्ट्या संवेदनशील

  जळगाव, दि. 11 - भारत निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात 03-जळगाव लोकसभा व 04-रावेर लोकसभा मतदार संघ असे दोन मतदार संघ येत असून या मतदार संघात निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची सर्वातोपरी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणूका निर्भय वातावरणात व पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
  लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे म्हणाले की, जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी जिल्ह्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 28 मार्च, 2019 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक 4 एप्रिल असून नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल असून मंगळवार, 23 एप्रिल, 2019 रोजी मतदान होणार होईल. तर गुरुवार, 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.
  जळगाव लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1960 मतदान केंद्र असून 53 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 19 लाख 09 हजार 735 इतके मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 1 हजार 249 पुरुष तर 9 लाख 8 हजार 427 महिला तर 59 इतर मतदारांचा समावेश आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 1872 मतदान केंद्र असून 87 सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 17 लाख 60 हजार 175 इतके मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 17 हजार 488 पुरुष तर 8 लाख 42 हजार 661 महिला तर 26 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 7 हजार 393 पुरुष तर 59 महिला असे एकूण 7452 सैनिक मतदार
असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
  लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याकरीता 8 हजार 17 बॅलेट युनिट, 4 हजार 583 कंट्रोल युनिट तर 4 हजार 927 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहे. निवडणूकीसाठी जिल्ह्यात 30 हजार 370 अधिकारी, कर्मचारी आवश्यकता असून 32 हजार 529 इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 172 व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 192 असे एकूण 364 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांच्या मदतीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक जिल्हास्तरावर कार्यरत करण्यात आहे.  आचार संहितेची प्रभावीपणे अंमजबजावणी होण्यासाठी तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे C-vigil ॲपचाही वापर करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर आचारसंहिला अंमलबजावणी, मतदान यंत्रे, मतदार जागृती व प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, खर्च व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, दिव्यांग मतदार व्यवस्थापन आदिंसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 28 मतदान केंद्र क्रिटीकल तर 40 मतदान केंद्र सामाजिकदृष्टया संवेदनशील असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
                                                                 000

No comments:

Post a Comment