Monday, 17 December 2018

बुधवारी शहरात रोजगार मेळाव्याचे आयोजन


              जळगाव, दि. १७ :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ. कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, आणि जळगाव शहर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने के. सी. ई सोसायटी इंजिनियरींग कॉलेज परीसर, जिल्हा उद्योग केंद्रामागे, नॅशनल हायवे क्र. ६, जळगाव येथे बुधवार, दिनांक १९ डिसेंबर, २०१८ रोजी सकाळी १० वाजेपासून पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.
            या मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी एकूण चारशे रिक्त पदांची मागणी कळविलेली आहे. शैक्षणिक पात्रता १० वी पास , १२ वी पास, आय.टी.आय. पास, पदवीधर अशी आहे.
          या खाजगी आस्थापनांमधील विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इत्यादीसह बुधवार दिनांक १९ डिसेंबर, २०१८ रोजी सकाळी ठीक १० वाजता केसीई सोसायटी इंजिनियरींग कॉलेज परीसर, जिल्हा उद्योग केंद्रामागे, नॅशनल हायवे क्र. ६ जळगाव येथे उपस्थित रहावे.
            नियोक्त्यांकडून देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत व इतर सवलतीबाबत रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी माहिती देणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ जिल्ह्यातील इच्छूक बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment