भुसावळ येथे बहिणाबाई
महोत्सवाचा समारोप
जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :- गुरुनाथ
फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवातून सामाजिक,
शैक्षणिक, आर्थिक, महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत महिलांचा सन्मान म्हणजे
मातृशक्तीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य,
मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ विभागाचे राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांनी केले.
गुरुनाथ फाउंडेशन, मुक्ताईनगर यांच्यातर्फे भुसावळ येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर बहिणाबाई महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या
महोत्सवाचा आज सायंकाळी समारोप झाला. त्यावेळी ते बोलत. यावेळी फाउंडेशनच्या
अध्यक्षा, खासदार रक्षाताई खडसे, जळगावच्या महापौर सीमाताई भोळे, आमदार एकनाथराव
खडसे, हरिभाऊ जावळे, संजय सावकारे, 'महानंदा'च्या अध्यक्षा मंदाताई खडसे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, भुसावळचे उपविभागीय अधिकारी श्री. चिंचकर,
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, तहसीलदार श्री. थोरात, माजी आमदार गुरुमुख
जगवानी, रमेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी विविध
स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच बहिणाबाई पुरस्कार देवून 12 महिलांना गौरविण्यात आले.
सामाजिक व विशेष साहाय्य राजमंत्री श्री. कांबळे
म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणारा बहिणाबाई महोत्सव हा उपक्रम
अत्यंत उपयुक्त व कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटांना हक्काचे व्यासपीठ
उपलब्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांना व्यासपीठ
मिळाले आहे. हा महोत्सव वेगवेगळ्या शहरात व्यापक स्तरावर आयोजित करण्यात यावा. या
महोत्सवास सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार श्रीमती खडसे यांनी सांगितले, गुरुनाथ
फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण
भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील 350 बचत
गट सहभागी झाले होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,
असेही त्यांनी नमूद केले. प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी
महिला बचत गटाच्या सदस्या, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या
महोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला नागरिकांनी भेट दिली.
000
No comments:
Post a Comment