जळगाव, दि. 20 - राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकाच्या हिताचे
रक्षण करण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाकडून ग्राहकांसाठी प्रबोधन अभियान
राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत विभागातर्फे ग्राहकांसाठी काही महत्वपूर्ण
सुचना केल्या आहेत. या सुचनांची अंमलबजावणी ग्राहकांनी केल्यास त्यांची फसवणूक
होणार नाही. असे आवाहन सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव यांनी केले आहे.
वजन व मापाची दशमान पध्दत ही
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वसामन्य झालेली आधुनिक पध्दत असून आपल्या देशातील सर्व व्यवहारांमध्ये
फक्त ती एकमेव अशी कायदेशीर पध्दत आहे. वजन मापातील दशमान पध्दत फक्त व्यापार व
उदीमात उपयुक्त नसुन ती राष्ट्रीय एकात्मतेसही मदत करते. वजन माप विषयक कायदे
ग्राहक संरक्षणासाठी अंमलात आले आहेत. त्या दृष्टीकोनातुन आपल्या विभागाचे
निरीक्षक वैधमापन शास्त्र कोण व कुठे आहेत ते जाणुन घ्या. खरेदी करतांना दिलेल्या
मोबदल्यात वस्तु वजनात / मापात संख्येस बरोबर मिळत असल्याची खात्री करुन घ्या. वजन
मापात लबाडी केल्यास कठोर दंडाची शिक्षेची तरतुद कायद्यात करण्यात आलेली आहे. सर्व
वजने मापे तोलन मापन उपकरणे यांची निरीक्षक वैधमापन शास्त्र यांच्याकडुन नियतकालिक
पडताळणी व मुद्रांकन करुन घेणे कायद्याने बंधन कारक आहे. वजने मापे तोलन मापन
उपकरणे यांची पडताळणी केल्याबाबतचा त्यावर शिक्का असल्याची (उदा. 18A 18B, 18C) वजने, मापे तोलन, मापन
उपकरणे यांची पडताळणी केल्यानंतर ते बरोबर आढळून आल्यास त्यावर शिक्के उमटविण्यात
येतात. यामध्ये निरीक्षकाचे ओळख, ठसा क्रमांक, मुद्रांकनाचे वर्ष व तिमाहीचा
समावेश असतो. प्रत्येक कॅलेडर वर्ष A,B,C व D
या तिमाहीमध्ये विभागलेले आहे. व्यापा-याने दांडीचा तराजु हुकाला किंवा
स्टँडला टांगुन ठेवणे बंधनकारक आहे. याकडे आपले लक्ष असु द्या, अन्यथा व्यापारी
हातचलाखीने आपणांस कमी माल देण्याचा संभव आहे. ईलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांव्दारे
वस्तु खरेदी करतांना दर्शक 00 असल्याची खात्री करा.
ग्राहक वजन करण्याची प्रक्रीया
स्पष्टपणे पाहु शकेल अशा रीतीने व्यापा-याने तोलन उपकरणे ठेवलेले असल्याची खात्री
करा. वजन किंवा मापन करण्याची रीत समजुन घ्या आणि आपण खरेदी केलेल्या मापाचे वजन व
मापन करतांना निरीक्षण करा. कृपया आपण आवश्यक वस्तु अथवा द्रव्ये, पाव किंवा पाऊण
या परीमाणात खरेदी न करता पुर्ण दशमान
परीमाणात, ( उदा. 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम , 500
ग्रॅम, 1 किलोग्रॅम/ 200 मिली, 500 मिली, 1 लिटर इत्यादी खरेदी करा. पेट्रोलपंपावर
वाहनामध्ये तेल भरण्यापुर्वी दर्शक 00 असल्याची खात्री करा. वितरणाबाबत शंका
असल्यास वितरकांने ठेवणे बंधनकारक असलेल्या 5 लिटर प्रमाणित मापाव्दारे वितरणाची
अचुकता तपासा. मिठाई खरेदी करतांना मिठाईचे वजन खोक्यासहीत केले जात नसल्याची
खातरजमा करा. स्वयंपाकाचा गॅसचे सिलीडर स्विकारतांना त्याचे सिल व्यवस्थित
असल्याचे खात्री करा. सिलेंडर स्विकारण्यापुर्वी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले
बंधनकारक असलेल्या तोलन उपकरणांवर वजन तपासुन पहा. रिकाम्या सिलेंडरचे वजन व गॅसचे
निव्वळ वजन सिलेंडरवर दर्शविण्यात आलेले असते. तसेच ते व पावतीवर दर्शविलेले वजन
पडताळुन पाहता येईल. गॅसचे निव्वळ वजन अचुक नसल्यास गॅस सिलेंडर नाकारु शकतो.
आयात आवेष्टित वस्तु आवेष्टनावर सदर वेष्टीत वस्तु ज्या देशातुन आयोत
करण्यात आली आहे. त्या देशाचे नाव असणे बधनकारक आहे. एकाच प्रकारच्या व एकाच
क्षमतेच्या आवेष्टित वस्तुवर वेगवेगळया किमती छापता येणार नाहीत. शेतक-यांनी
आपल्या वस्तु अथवा माल जिनिंग मिल, कापुस खरेदी विक्री संघ, कृषि उत्पन्न बाजार
समिती अथवा साखर कारखाने यांच्याकडे देते वेळी शंका असल्यास संबंधित तोलन
उपकरणांच्या ठिकाणी ठेवणे बंधनकारक असलेल्या प्रमाणित वजनाव्दारे तोलन उपकरणांची
अचुकता तपासुन पाहु शकता. वजने मापे विषयक आणखी माहीती हवी असल्यास खालीलप्रमाणे
संकेतस्थळावर भेट द्यावी.http://consumeraffaires.nic.in www.vaidhmapan.maharashtra.gov.in443/Homepage/index.html अथवा सहाय्यक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, मंडोरे
मार्केट, आंबेडकर मार्केट जवळ, जिल्हापेठ, जळगाव दुरध्वनी क्रमांक 0257-2241149
अथवा aclmjalgaon@yahoo.in या
ईमेलवर संपर्क साधावा.
०००
No comments:
Post a Comment