Wednesday, 11 July 2018

सैनिकी मुले व मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी 18 जुलै रोजी प्रवेश प्रकिया

     जळगाव, दि. 11 - सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात आजी व माजी सैनिकांच्या इयत्ता आठवीपासून पुढील विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या मुलांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात सन 2018-19 मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेशप्रक्रिया  18 जुलै, 2018 रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
     माजी सैनिक विधवांच्या मुलांना निशुल्क प्रवेश दिला जाणार असून माजी सैनिकांच्या मुलांना भोजन व इतर शुल्कामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यानुसार शिपाई ते हवालदार यांच्या मुलांसाठी रु. 600/- प्रतिमाह, जेसीओ यांच्या मुलासाठी रु. 800/- प्रतिमाह, सैनिकी अधिकारी यांच्या मुलांसाठी रु. 1000/- प्रतिमाह तसेच जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांच्या मुलांसाठी रु 1800/- प्रतिमाह अशा माफक दरप्रमाणे भोजन, निवास, सेवा यांच्या समावेशासह शुल्क आकारण्यात येणार आहे.
     या वसतिगृहात विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रिडा स्पर्धांचे व सहलीचे आयोजन केले जाते. तसेच व्यायामशाळा व वाचनालयाची सुविधासुध्दा उपलब्ध आहे. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वेकरुन सैन्य सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून वसतिगृहात राहणा-या विदयार्थ्यांना उत्तम शिस्त लावली जाते व योग्य मार्गदर्शन केले जाते.
    जळगाव जिल्ह्यातील आजी व माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या पत्नी यांनी त्यांच्या मुलांना प्रवेश मिळविण्याकरीता अधिक माहितीसाठी श्री. पी. आर. गरुड, वसतीगृह अधिक्षक, यांचेशी मो.न. 9975207097 व दूरध्वनी क्र. 0257-2233088 वर संपर्क साधावा. तर मुलींना प्रवेश मिळण्याकरीता अधिक माहितीसाठी श्रीमती. अनिता पाटील, वसतीगृह अधिक्षीका यांचेशी मो.न. 8788245282 व दूरध्वनी क्र. 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment