Friday, 13 July 2018

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत काम करण्यास टाळटाळ करणा-या बीएलओ वर होणार कायदेशीर कारवाई


        जळगाव, दि.13 - जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुरनिक्षण कार्यक्रम 11 मे, 2018 पासून सुरु झालेला आहे. दिनांक 1 जानेवारी, 2019  या  अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात बी.एल.ओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. बी.एल.ओ यांनी घरोघरी भेटी देवून दुबार मतदार, मयत मतदार, नवमतदार इ. ची माहिती तसेच मतदार यादीमध्ये कृष्णधवल फोटो (छायाचित्र) असलेल्या मतदारांची रंगीत फोटो (छायाचित्र) जमा करणे इत्यादी कामे करणे आवश्यक आहे.
          मात्र काही बी.एल.ओ काम करण्यास नकार देतात तसेच काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा बी. एल. ओ वर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 32 आणि भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकरी श्री. निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
          तसेच जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांचे वय 1 जानेवारी, 2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होणार आहे. अशा नागरिकांनी दिनांक 1 सप्टेबर, 2018 ते 31 ऑक्टोबर, 2018 या कालावधीत आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे मात्र त्यांचा फोटो (छायाचित्र) कृष्णधवल आहे. तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे. परंतु (छायाचित्र) नाही त्यांनी रंगीत फोटो (छायाचित्र) संबंधित बी.एल.ओ. यांचेकडे किंवा तहसिल कार्यालयाकडे तात्काळ जमा करावे.
          ज्या मतदारांचे नातेवाईक मयत झालेले असतील अशा मयत मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार यादीत दुबार नाव असल्यास मतदार यादीत एक नाव ठेवून अनावश्यक असलेल्या भागातून आपले नाव वगळणेकामी शासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment