जळगाव, दि. 20 - राज्यतील बहुतांशी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये जिनिंग प्रेसींग
मिल्स व कापूस सरकीपासून तेल काढणारे उद्योग कार्यरत आहेत. त्यांच्या गोडावूनमध्ये
कापूस व सरकी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली आहे. या गोडावूनमध्ये ठेवलेल्या
कापूस व सरकीमध्ये शेंदरी बोंडअळीचे कोष मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. सदर किडसाठी सद्या पोषक वातावरण
निर्माण झाले असल्याने त्यामधून पतंग बाहेर पडत असून ते जिनींग प्रेसीग मिल्समध्ये
लावलेल्या फेरोमन सापळ्यामध्ये आढळून येत आहे. सदरचे पतंग 2-3 कि.मी पर्यंत
असलेल्या आसपासच्या कापूस लागवड क्षेत्रात अंडी घालण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी
कृषि विभागामार्फत खालीलप्रमाणे आवश्यक त्या सुचना देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व कापूस जिनिंग मिल्स व
सरकीपासून तेल काढणा-या कारखानाच्या परिसरात साफसफाई करुन घ्यावी. किडग्रस्त व
रोगग्रस्त असतव्यस्त पडलेला कापूस व सरकी तसेच सरकीपासून उगवून आलेली रोपे नष्ट
करुन परिसर स्वच्छ करावा. केंद्रिय कापूस
संशोधन केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्व जिनिंग मिल्स व सरकीपासून
तेल काढणा-या उद्योगाच्या परिसरामध्ये निर्माण होणारे पतंग जागेवरच पकडून नष्ट
करण्यासाठी प्रत्येक 10 मी. अंतरावर शेंदरी बोंडअळी साठीचे फेरोमन सापळे लावून त्यामधील
लुअर्स वेळोवेळी बदलण्यात यावे. फेरामन सापळ्यामध्ये पकडलेले पतंग वेळोवेळी नष्ट करण्याची
खबरदारी घ्यावी. त्यांना सापळ्यामध्येच
मारु नये. लहान तोडाच्या बाटली मध्ये पतंग स्थलांतरीत करावेत. सदर बाटली मध्ये
क्विननॉलफॉस किंवा क्लोरोपायरीफॉस या किटकनाशकांचे द्रावण टाकावे. ज्या ठिकाणी
कच्चा कापूस ठेवलेला आहे. तेथे कापूस ताडपत्रीने पुर्णपणे झाकूण ठेवावा. जेणेकरुन
त्यामध्ये तयार होणारे पतंग बाहेर येणार नाहीत व आतच नष्ट होतील. जिनिंग प्रेसिंग मिल्सच्या परिसरामध्ये असलेल्या
कापूस लागवड क्षेत्रातील शेतक-यांना कामगंध सापळे लावणेबाबत सल्ला देणे व कामगंध
सापळ्यात पतंग सापडल्यास थयोडीकार्ब सारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी. असेही कृषि
विभागाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment