Thursday, 19 July 2018

एक ऑगस्ट पासून विवाह नोंदणीची नोटिस ऑनलाइन सादर करणे बंधनकारक


जळगाव, दि. 19 - विशेष विवाह कायद्यातंर्गत विवाहासाठीची नोटीस ऑनलाइन देणेची सुविधा दस्त नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून विशेष विवाहासाठीची नोटिस ऑनलाइन देणे बंधनकराक करण्यात आले आहे. अशी माहिती व्ही. एस. भालेराव, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
विशेष विवाह नोंदणी करीता वर व वधू यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटिस देणे व 30 दिवसानंतर विवाह संपन्न करणे असे दोन वेळा जावे लागत होते. यापैकी नोटिस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजीत वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे. यासाठी मुद्रांक विभागाच्या igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ऑनलाइन व्यवस्थेमुळे विवाह इच्छूकांचा वेळ व पैसा वाचणार
विवाह इच्छुक वधु-वर यांना नियोजीत विवाहाची नोटिस वय व रहिवास या साठीच्या पुराव्याच्या कागदपत्रांसह संबंधीत जिल्ह्याचे विवाह अधिकारी यांना सादर करुन नोटिस फि भरावी लागते. तीची खात्री करुन ती नोटिस बोर्डावर लावली जाते. नोटिस दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत विवाह संदर्भात आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या 60 दिवसात वर- वधू यांची 3 साक्षीदारांसमक्ष विवाह अधिका-यासमोर विवाह नोंदणी केली जाते. विवाह नोंदणी नंतर संबंधीत दांम्पत्यास प्रमाणपत्र दिले जाते. ऑनलाईन प्रक्रियेमुळे आता वधू व वराचा या प्रक्रियेत खर्ची पडणारा वेळ व पैसा वाचणार आहे.
    या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने संबंधीत विवाह नोंदणी कार्यालयामध्ये सुचना फलक लावण्यात आलेला आहे. याचा जळगाव जिल्ह्यातील जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन  श्री. भालेराव, सह जिल्हा निबंधक तथा मुद्राक जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment