Tuesday, 12 September 2017

जिल्हा कारागृहातील 16 बंदी शेतकऱ्यांनी भरले शेतकरी कर्जमाफी योजनेचे ऑनलाईन अर्ज



       जळगाव, दि.12:- येथील जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या 16 शेतकऱ्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरले असून आता या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
            राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी देशातील सर्वात मोठी अशी 34 हजार कोटी रुपयांची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहे.
            या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून जिल्हयातील कोणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये.  सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि इतर लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून आज जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या 16 शेतकऱ्यांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. यासाठी महसुल, सहकार, कारागृह प्रशासन तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी विशेष परिश्रम घेतले.
            महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जळगाव यांचेमार्फत न्यायालयामध्ये समांतर विधी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आठवडयातून चार दिवस समांतर विधी सहाय्यकांमार्फत कारागृहात भेट दिली जाते. या भेटी दरम्यान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव या कार्यालयाकडे कारागृहात बंदी असलेल्या शेतकरी बंद्यांनी कर्जमाफी योजनेअंतर्गत अर्ज भरण्याकरीता मदत करण्याची विनंती केली होती. शासनाच्या योजनांचा लाभ वंचितांना मिळावा यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्न करीत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सविता टी. बारणे यांना बंदी शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले तसेच आवश्यक ते मार्गदर्शन केले.
            त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे व समांतर विधी सहाय्यक विजय दर्जी यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था विशाल जाधवर यांचेशी संपर्क करुन योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केली. यासाठी जिल्हा कारागृहाचे बी. एम. तडवी, एस. बी. भुयार, जिल्हा सरकारी वकील ॲड केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड आर. आर. महाजन जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य तसेच जिल्हा समन्वयक महाऑनलाईन चे स्वप्नील पाटील, सेतु सुविधा केंद्राचे संजय खैरनार यांचे सहकार्य मिळाले. आणि त्यानुसार आज 16 न्यायालयीन शेतकरी बंद्यानी ऑनलाईन कर्जमाफी योजनेचे अर्ज जिल्हा कारागृह, जळगाव येथे भरुन दिले.
          याप्रसंगी बंदी शेतकऱ्यांचे कुंटूंबीय उपस्थित होते. बंदी शेतकऱ्यांच्या कुटूंबाला कारागृहात प्रवेश मंजुर करण्यासाठी कारागृह अधिक्षक यांनी सहकार्य केले.
०००००

No comments:

Post a Comment