Friday, 15 September 2017

बदलत्या परिस्थितीनुसार प्रशिक्षणाचे ज्ञान आवश्यक -जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर





          जळगाव दि. 15 :- शासन हे नियम, अधिनियम, आदेश यानुसार चालते. बदलत्या परिस्थितीत कालपरत्वे शासनाने केलेल्या कायद्यामध्ये अनेक महत्वपूर्ण सुधारणा होत असतात. अशा बदलाचे किंवा सुधारणांचे अद्यावत ज्ञान शासकीय कर्मचाऱ्यांना असणे ही काळाजी गरज आहे. तसेच शासनाची ध्येय धोरणे राबवितांना प्रशासनातील कर्मचाऱ्यांना शासकीय नियमांचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. जिल्हा प्रशासकिय प्रशिक्षण संस्था जळगाव, यशदा पुणे आणि दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकरी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले.
            त्यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते. श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की,  कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कौशल्ये, ज्ञान व दृष्टीकोन अद्यावत करण्यासाठी राज्य प्रशिक्षण धोरण शासनाने राबविले आहे. त्याचा कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘‘शासनाचे खरेदी धोरण’’ व ‘‘राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना’’ या विषयांवर यशदाचे तज्ज्ञ प्रशिक्षक जी. टी. महाजन, एच. आर. पाटील हे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार आहेत. या शिबीरासाठी महसुल, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे सुमारे 140 कर्मचारी उपस्थित होते. आतापर्यंत अमळनेर, पाचोरा व एरंडोल या ठिकाणी अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे 700 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पुढेही भुसावळ व सावदा येथे देखील शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत एकूण 1500 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे.
            प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन प्रसंगी निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके,  वन प्रशिक्षण संस्थेचे संचालक कृष्णा भवर, उपसंचालक एल. बी. राणे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संचलन प्रा. अशोक पवार यांनी केले.
            शिबीराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक समन्वयक बी.एस. केदार, प्रशिक्षण सहाय्यक अशरफ तडवी,  सहाय्यक इरफान यांनी परिश्रम घेतले. प्रा. अशोक पवार यांनी आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment