. लवकर निदान व लवकर उपचार हाच कुष्ठरोग निमुर्लनाचा आधार.
·
कुष्ठरोग अनुवंशिक नाही, पाप पुण्याशी संबंधित नाही.
·
त्वरीत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग बरा होऊन विकृती
टाळता येते.
·
औषधोपचार सर्व शासकीय, निमशासकीय दवाखान्यात, केंद्रात मोफत
दिला जातो.
·
कुष्ठरोग इतर आजारासारखाच रोगजंतूमुळे होणारा आजार आहे.
जळगाव दि. 5 :- कुष्ठरोग इतर आजारासारखाच रोगजंतूमुळे होणारा आजार आहे. त्वरीत
निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग बरा होऊन विकृती टाळता येते. यासाठी लवकर निदान व
लवकर उपचार हाच कुष्ठरोग निमुर्लनाचा आधार आहे. तरी नागरीकांनी मनात कसलीही भिती न
बाळगता आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या पथकास सहकार्य करावे. जेणेकरुन जिल्हयात
कुष्ठरोग शोध अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मदत होईल. असे आवाहन जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार आजपासून
राज्यातील 22 जिल्ह्यात व 234 तालुक्यात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यास सुरुवात
झाली. या अभियानात जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या
अभियानाचा शुभारंभ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
उपजिल्हाधिकारी महसुल अभिजित भांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर.
पाटील, डॉ. संजय चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, सहायक संचालक
(कुष्ठरोग) डॉ. अरविंद्र मोरे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्राच्या
प्राचार्य प्रणिता गायकवाड, डॉ. शेखर पाटील, कमलेश चव्हाण, विनोद पाटील यांच्यासह
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी व नर्सिंगचे विद्यार्थी मोठया संख्येने
उपस्थित होते.
समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण शोधुन
त्यांना बहुविध उपचारासाठी आणण्याकरीता 5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान
राबविण्यात येत आहे. हे अभियानात ग्रामीण व निवडक शहरी (झोपडपट्टी) भागात
राबविण्यात येणार आहे. या अभियानात एक पुरुष व एक स्त्री स्वयंसेवक (प्रामुख्याने
आशा वर्कर) यांच्या पथकामार्फत 14 दिवस घरोघरी जावून सर्व्हेक्षण करण्यात येणार
आहे. सर्व्हेक्षणात सर्व व्यक्तींची शारिरिक तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण
भागात दररोज 20 व शहरी भागात 25 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या काळात आढळून आलेल्या
सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची नोंद पथकाद्वारे घेण्यात येणार आहे. त्यांचे निश्चित
निदान शासकीय, निमशासकीय रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे.
कुष्ठरोगाचे निश्चित निदान झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी घरोघरी
येणाऱ्या पथकास सहकार्य करावे. घरातील सर्व व्यक्तींची स्त्री व पुरुष आरोग्य
स्वंयसेवकांकडून तपासणी करुन घ्यावी. अभियानात आढळून आलेल्या संशयीत रुग्णांची
वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात
आले आहे.
या सर्व्हेक्षणातंर्गत गृहभेटीसाठी 2
हजार 816 पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये 592 पर्यवेक्षकांचाही समावेश आहे. या
पथकातील स्वंयसेवक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले असून पर्यवेक्षण
जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी
यांचेकडून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. अरविंद मोरे यांनी
या अभियानाचा उद्देश सांगितला. उपस्थितांचे आभार डॉ. शेखर पाटील यांनी मानले.
00000
No comments:
Post a Comment