Friday, 15 September 2017

ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील - जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन


      
 

जळगाव, दि. 15 :- अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय मुळे फूटबॉल या खेळाचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागापर्यंत पोहचत असून हा खेळ गाव, वाडी, वस्ती, तांडयांपर्यंत पोहचल्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात केले.
अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र मिशन 1 मिलियन कार्यक्रमांचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. उज्वलाताई पाटील, आमदार सौ स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, कैलास सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्रा.) बी.जे. पाटील शिक्षणाधिकारी (माध्य.) देविदास महाजन छात्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते श्री. गणपत पोळ, अशोक चौधरी, सौ. अंजलीताई पाटील, एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
    ना. महाजन पुढे म्हणाले फुटबॉल हा स्वस्त व आरोग्यासाठी शारीरीक व्यायाम होणारा खेळ असून जिल्ह्यातील सर्व गावांत, वाडी, वस्ती तांडयांपर्यत फूटबॉल पोहचविण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. आपल्या शाळेतील प्रत्येक मुलगा फुटबॉल खेळाशी जोडला जाईल असे नियोजन करुन त्यात सातत्य ठेवावे. जिल्ह्यातील 2301 शाळांमध्ये आज फुटबॉल खेळला जाणार आहे. जिल्ह्यात चांगले नियोजन केले आहे. त्याबद्दल संबंधीताचे अभिनंदन त्यांनी केले. ना. महाजन यांनी आपले मनोगत सुरु करण्यापूर्वी स्टेडीयममध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना भारत माता की जयवंदेमातरम अशा घेषणा देवून वातावरण निर्माण केले. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. या कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने तयार केलेले संगणक आज्ञावलीचे उदघाटन ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक जळगाव जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे सचिव फारुख शेख यांनी 1 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत फूटबॉल खेळाचा प्रचार व प्रसिद्धी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
   जिल्हा क्रिडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील यांनी मान्यवरांचे फुटबॉल व स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. कार्यक्रमांचे सुत्र संचलन क्रीडा संचालिका प्रा. कोल्हे यांनी केले.
अधिकारी लोकप्रतिनिधींचा फूटबॉल सामना बरोबरीत
उदघाटन समारंभानंतर आयोजित अधिकारी व लोक प्रतिनिधी यांच्यात फूटबॉल सामना झाला. लोकप्रतिनिधी संघात ना. महाजन, महापौर ललित कोल्हे इतर अधिकाऱ्यांच्या संघात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी सहभागी होते. अधिकारी संघाने प्रथम गोल नोंदवून आघाडी घेत सामन्यात चुरस निर्माण केली,  हा गोल श्री. कराळे यांनी केला. अंतिमक्षणी ना. महाजन यांनी गोल करुन सामना बरोबरीत संपला. दोन्ही संघाला स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
अवघा महाराष्ट्र फूटबॉलमय आयोजनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल फारुख शेख यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    चित्रकला व वकृत्व स्पर्धेला या महोत्सवासाठी शालेय विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते. 5 मैदानांवर उपस्थित शाळांच्या विद्यार्थी संघादरम्यान फूटबॉल सामने आयोजित केले होते. यावेळी स्टेडीयमवर उपस्थित विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
०००००


No comments:

Post a Comment