Thursday, 28 September 2017

महाआरोग्य शिबिरात येणाऱ्या रुग्णांच्या पूर्व तपासणीसाठी लागणारी नोंदणी फी आकारण्यात येवू नये-जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



     

        जळगाव, दि.28 :-  रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा असून सामाजिक भावनेतून सर्वांनी या महाआरोग्य शिबीरात काम करावे. तसेच महाआरोग्य शिबिरात येणाऱ्या रुग्णांच्या पूर्व तपासणीसाठी लागणारी नोंदणी  (केस पेपर) फी रुग्णांकडून घेण्यात येवू नये. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी (2 ऑक्टोबर) रोजी फैजपूर येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबीराची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय काराळे, उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. श्रीमती एल. आर. घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. पाटील, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख यांचेसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विभागनिहाय सोपविण्यात आलेल्या जबाबदारी बाबत चर्चा करण्यात आली. तसेच सोपविलेली कामे प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडण्याच्या सूचना यावेळी  जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांची ने- आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, औषधे, वैद्यकीय मनुष्य बळ, वैद्यकीय उपकरणे, अग्निशामक व्यवस्था, मंडप, हेलीपॅड, सार्वजनिक  स्वच्छता गृह, ऑपरेशन थिएटर, पिण्याचे पाणी, भोजन आदि बाबींवर चर्चा करण्यात आली.  रुग्णांच्या पूर्व तपासणीचे काम महत्वाचे असून यासाठी होणारी अनावश्यक गर्दी टाळून गरजू रुग्णास आवश्यक असलेली रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आशावर्कर, अंगणवाडी सेविका, कृषीसेवक, तलाठी, ग्रामसेवक हे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचणारे शासनाचे घटक आहे. या शिबीरात त्यांची भूमीका अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची आहे. रुग्णापर्यंत आरोग्य शिबीराची माहिती पोहोचविण्यासाठी त्यांची मदत घ्यावी.
तसेच या महाआरोग्य शिबिरात येणाऱ्या रुग्णांची तपासणी मोफत करण्यात येणार असल्याने पूर्वतपासणी करतांना लागणारी नोंदणी फी त्यांचेकडून घेण्यात येवू नये. अशा सुचनांही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
या महाआरोग्य शिबिराच्या कालावधीत रुग्णांवर विविध शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याने या कालावधीत विद्यूत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता विद्यूत विभागाने घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. आरोग्य शिबीरात उत्कृष्ट कार्य कारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यशोचित गौरव करण्यात येणार  असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
००००००

No comments:

Post a Comment