Tuesday, 29 May 2018

31 मे पासून तंबाखू विरोध सप्ताहाचे आयोजन स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


            जळगाव, दि. 29 -  जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोध दिवस म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने 31 मे ते 6 जून 2018 या कालावधीत जिल्ह्यात तंबाखु विरोध सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
            या सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशो राजे निंबाळकर यांनी केले आहे.
            या सप्ताहाच्यानिमित्ताने जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सर्व कार्यालयांमध्ये 31 मे रोजी सकाळी 11 वाजता तंबाखू विरोधी शपथ घेण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, कोचिंग क्लासेस तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी सामाजिक/स्वयंसेवी संस्था यांनी आपल्यापरीने जास्तीत जास्त लोकांना तंबाखू विरोधी शपथ देऊन तंबाखूच्या दुष्परिणामांची चर्चा करुन त्यांना तंबाखू विरोधी कायद्याची माहिती देण्याचे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले आहे.
            या सप्ताहात जागतिक आरोग्य संघटनेने या दिवसासाठी "तंबाखू आणि हृदयरोग" ही संकल्पना दिली आहे. तरी जिल्हा व तालुकास्तरावरील सामाजिक संस्थांनी हृदयरोग व मुख कर्करोग तपासणी शिबिरे राबवून तंबाखूविषयी जनजागृती व तंबाखूविरोधी कायद्याची माहिती जनतेस करून द्यावी व या मोहिमेस हातभार लावावा. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी कळविले आहे. तर तंबाखू सेवन करणारे व तंबाखूजन्य उत्पादनांचे विक्रेते यांनी तंबाखू विरोधी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे आणि सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन श्री. शाह यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment