जळगाव, दि. 31 - जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ दिली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयात उपस्थितांना नागरीकांचे तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाबद्दल उद्बोधन करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी सन 2010 मध्ये तंबाखूच्या सेवनामुळे झालेल्या मुख कर्करोगाच्या विळख्यातून वाचलेले व शस्त्रक्रिया केल्यामुळे चेहरा विद्रुप झालेले राज मोहम्मद शेख हे लोकांना तंबाखू सोडण्यास प्रवृत्त करीत असलेले तसेच सध्या शाळांना सुट्या असूनही आजच्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेऊन त्याचे प्रदर्शन लावणारे शिक्षक श्री. प्रवीण पाटील यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तंबाखू सेवनाने होणारे कर्करोग तसेच विविध हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू इ प्रमुख आजारांबरोबरच आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू नयेत. यासाठी सर्वांनी तंबाखू सोडावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी उपस्थितांना केले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, दंतशल्य चिकित्सक डॉ संपदा गोस्वामी, ग्रामीण रुग्णालय मुक्ताईनगर येथील डॉ अच्छा, कर्करोग तज्ञ डॉ. निलेश चांडक, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांचेसह विविध संस्था, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, नागरीक, दंत विभाग व तंबाखू नियंत्रण कक्षाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment