Friday, 30 November 2018

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसिस युनिटचे ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन


          जळगाव, दि . 30 - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नुतनीकरण करण्यात आलेल्या डायलेसिस युनिटचे उद्धाटन शनिवार, 1 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी 4.00 वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता यांनी दिली आहे.
                                                                      000

संविधान सप्ताहानिमित्त चाळीसगावात संविधान गौरव रॅली संपन्न

      जळगाव, दि. 30 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात जात आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
     संविधान सप्ताह निमित्ताने मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चाळीसगाव यांच्यावतीने रेल्वे स्टेशन पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुहिक वाचानाने झाली. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी विजय पाटील, वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी भालेराव, तालुका समन्वयक अनिल पगारे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती केवळ संविधानानेच शक्य झाली आहे. तसेच संविधान हाच सर्वश्रेष्ठ कायदा असून त्याला अनुसरुनच इतर कायद्यांची निर्मिती झाली. सौ. भालेराव यांनी स्त्रियांना सन्मानाचे जगणे देणा-या संविधानाचा गौरव करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. आज महिलांसह वंचित घटकांना न्याय संविधानामुळेच मिळत असल्याचे सांगितले. या संविधान गौरव रॅलीची सुरुवात अप्पर पोलीस अधिक्षक बच्छाव यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केली या वेळी मोठ्या प्रमाणात संविधानावर आधारित घोषणांनी परिसर वसतीगृहातील मुलींनी दणाणून सोडला होता. रॅलीची सांगता आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
                                                                                                                                                                                                           संविधान सप्ताहानिमित्त प्रश्नोत्तरे व प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न     
                                                                                                                                                                                                            संविधान सप्ताहानिमित्त प्रत्येक तालुकास्तरावर संविधान जागर या कार्यक्रमातंर्गत चालता-बोलता प्रश्नोत्तरांचे कार्यक्रमांचे महाविद्यालय, बसस्टॅन्ड, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विविध हौसींग सोसायटी येथे आयोजन करण्यात आले. त्यात सहभागी स्पर्धकांना संविधानाची प्रत व विजेता स्पर्धकांना संविधानाची प्रत व महाडचा सत्याग्रह या पुस्तकांची भेट पुरस्कार स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगांव श्री योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक श्री गणेश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समतादुत यांनी परिश्रम घेतले.
त्याचबरोबर अंधश्रध्दा निमुर्लन समिती व समाज कल्याण विभाग, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्पवती गुळवे कन्या हायस्कुल येथे संविधान जागर कार्यक्रमात वैज्ञानिक दृष्टीकोन व भारतीय संविधान याविषयी प्रश्नमंजुषा घेवुन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेद्र धनगर, तालुका समन्वयक, जळगांव यांनी केले तर सुत्रसंचालन चद्रंकात इंगळे समतादुत यांनी केले
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री योगेश पाटील, अंधश्रध्दा निमुर्लन समिती, जळगांवचे जिल्हाध्यक्ष श्री डी. एस. कट्यारे, मुख्याध्यापक श्रीमती वैशाली पाटील, समतादुत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव तसेच अन्य मान्यवर व सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समाज कल्याण, सर्व तालुका समतादूत उपस्थित होते.
                                                                        ०००

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनीट्रॅक्टर व उपसाधने पुरविण्याबाबत

        जळगाव, दि. 30 - जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सन 2018-19 या वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये कळविले आहे.
           स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.  स्वयंसहाय्यता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मान्यताप्राप्त उत्पादकांकडून प्रथम खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा केल्यावर शासकीय अनुदानाच्या 50 टक्के रक्कम बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येईल. उर्वरित 50 टक्के अनुदान मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
     लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटांनी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा जादा अश्वशक्ती चा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल. मात्र त्याची या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदान रु. 3.15 पेक्षा जास्तची रक्कम संबधित बचत गटाने स्वत: खर्च करावी. स्वयंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बॅकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न करावे. निवड झालेल्या बचत गटाला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येईल. ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी सदरहू यंत्र चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे (परिवहन अधिकारी) व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
वरील अटी व शर्तीमध्ये जे बचत गट पात्र असतील अशा बचत गटांनी बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार वस्तु स्वरुपात मिळणा-या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय असल्याने बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत, गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बॅकेचे आधार क्रमांकाशी संलग्न खाते पासबुकाची प्रथम पानाची झेरॉक्स प्रत,बचतगटाचे घटनापत्र, बचत गट कार्यकारणी सदस्याची मुळ यादी, सदस्याचा स्वत:चा जातीचा दाखला, को-या कागदावर फोटोसह बचत गटाची ओळख, मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा अंतर्गत आरटीओ नोंदणी आणि स्थानिक जकात (लागू असल्यास) आणि विमा उतरविणेचा खर्च बचत गटांना करावयाचा आहे.
     बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांच्या कार्यालातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील याची नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी कळविले आहे. 
                                                                      000

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा

    जळगाव, दि. 30 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार, दिनांक 1 डिसेंबर, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
        शनिवार, दि. 1 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 6 वा 20 मि. नी. मुंबई सीएसटी येथून अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 7 वा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा 45 मि. नी शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून वाहनाने वल्लभदास वालजी म्युनिसिपल मार्केट, नवीपेठकडे प्रयाण. सकाळी 10 वा. वल्लभदास वालजी म्युनिसिपल मार्केट, नवीपेठ, जळगाव येथे आगमन व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादितच्या 49 व्या जळगाव शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ :- हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, नवी पेठ, जळगाव. सकाळी 11 वा. श्री. दिपक परदेशी, जळगाव यांच्या विवाह समारंभास उपस्थिती.  स्थळ:- बालाणी रिसॉर्ट, रेमंड चौफुली, सकाळ पेपरच्या शेजारी, जळगाव. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व महसूल व कृषि विभागाच्या अधिका-यांसमवेत दुष्काळ व इतर विषयाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वा. 30 मि. नी जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.
                                                                       ०००

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांचा सुधारित जिल्हा दौरा

     जळगाव, दि. 30-  राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख हे शनिवार दि. १  डिसेंबर, २०१८ जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
      शनिवार, दि. १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ६ वा १५ मि.नी. अमृतसर एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी ६ वा ३० मि.नी  जळगाव रेल्वे स्थानक येथून शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी ६ वा ४५ मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई- जळगाव शाखेचा उद्घाटन सोहळा. स्थळ :- हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, नवी पेठ, जळगाव. दुपारी १२ वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव ला सदिच्छा भेट. स्थळ- २७, रिंगरोड, जळगाव. दुपारी १ वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने पाचोरा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी ३ वा. सहकार मेळावा. स्थळ :- पाचोरा, जि. जळगाव, दुपारी ४ वा ३० मि.नी पाचोरा येथून धुळेकडे प्रयाण.
                                                                000

जिल्हा प्रशासन लागले लोकसभा निवडणूकीच्या कामाला निवडणूकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

         जळगाव, दि. 30 - आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. यासाठी सर्व विभागांनी आपआपसात समन्वय साधून पूर्वतयारी करावी. तसेच प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपविलेल्या कामांचे पूर्वनियोजन करुन अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. गुरूवार, 29 नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची निवडणूकीची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
          या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन श्री. रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती  शुभांगी भारदे, महानगर पालिकेचे उपायुक्त चंद्रकांत खोसे, राज्य मार्ग परिवहन महामंडाळाचे विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र देवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. प्रमोद बोरले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पंडीत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अरूण प्रकाश, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, महेश पत्की आदि अधिकारी उपस्थित होते.
         बैठकीत जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी विविध विभागांना विभागवार जबाबदारी सोपविली त्यात  पोलीस विभागाने निवडणूक काळात अवैध धंदे रोखणे, हद्दपारीच्या कार्यवाही करणे, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, अतिसंवेदनशिल व संवेदनशील केंद्र निश्चित करणे, प्लॉईंग स्कॉड तयार करणे, पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करणे, मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी बंदोबस्तासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, त्याची उपलब्धता कशी होईल आदिंचे नियोजन करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत निवडणूकीच्या काळात उपलब्ध होवू शकणाऱ्या बसेसबाबत माहिती घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री व वाहतूकीला आळा घालणे, तसेच सीमेवर चेकपोस्ट तयार करणे, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांचा डेटा तयार करणे तसेच निवडणूक संदर्भातील विषयांबाबत समन्वय साधणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने निवडणूक कालावधीत येणाऱ्या निवडणूक निरिक्षकांसाठी निवास व्यवस्था करण्यासाठी विश्रमागृहाची दुरूस्तीची कामे करणे. त्याचबरोबर निवडणूक काळात बँकेमार्फत होणाऱ्या व्यवहारांवर नजर ठेवणे व संशयास्पद व्यवहाराची माहिती घेणे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलीत करणे, दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, निवडणूक उपजिल्हाधिऱ्यांनी निवडणूकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची व वाहनांची माहिती घेणेबाबत विविध विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्यात.
          जिल्ह्यात रावेर व जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ असून एका मतदारसंघासाठी प्रत्येकी 5 असे एकूण दहा निवडणूक निरिक्षक येणार आहे. जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी एकूण 3 हजार 646 मतदान केंद्र असून त्यानुसार प्रत्येक मतदार केंद्राला प्रत्येकी 5 व 20 टक्के राखीव कर्मचारी  व इतर कामकाज याप्रमाणे अंदाजे 26 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्याला 4 हजार 354 कंट्रोल युनिट व 7 हजार 488 बॅलेट यूनिट प्राप्त झाले आहेत. निवडणूकीच्या कामासाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी व आवश्यक असणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यासाठी एकूण 2 हजार 321 वाहनांची आवश्यकता भासणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी बैठकीत दिली.
                                                                              000

संविधान सप्ताहानिमित्त चाळीसगावात संविधान गौरव रॅली संपन्न

      जळगाव, दि. 30 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात जात आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
     संविधान सप्ताह निमित्ताने मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, चाळीसगाव यांच्यावतीने रेल्वे स्टेशन पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुहिक वाचानाने झाली. याप्रसंगी उप कोषागार अधिकारी विजय पाटील, वसतिगृहाच्या गृहपाल शुभांगी भालेराव, तालुका समन्वयक अनिल पगारे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक श्री. बच्छाव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती केवळ संविधानानेच शक्य झाली आहे. तसेच संविधान हाच सर्वश्रेष्ठ कायदा असून त्याला अनुसरुनच इतर कायद्यांची निर्मिती झाली. सौ. भालेराव यांनी स्त्रियांना सन्मानाचे जगणे देणा-या संविधानाचा गौरव करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. आज महिलांसह वंचित घटकांना न्याय संविधानामुळेच मिळत असल्याचे सांगितले. या संविधान गौरव रॅलीची सुरुवात अप्पर पोलीस अधिक्षक बच्छाव यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून केली या वेळी मोठ्या प्रमाणात संविधानावर आधारित घोषणांनी परिसर वसतीगृहातील मुलींनी दणाणून सोडला होता. रॅलीची सांगता आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली. श्री. योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.
                                                                         000

Thursday, 29 November 2018

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूबांना आर्थिक मदत तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर

     जळगाव, दि. 29 - विविध कारणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटूंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या समितीपुढे एकूण 13 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी तीन प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. नऊ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली, तर एका प्रकरणात फेरचौकशी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
    या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या आठ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला.       
        या बैठकीत मनोहर भिवराज घोलप, रा. मंगरुळ, ता. अमळनेर, भिमराव दौलत वाघ, रा. गोरनाळे, ता. जामनेर, मुरलीधर झुंबर पाटील, रा. पिंपळकोठे, ता. पारोळा यांना आर्थिक मदत देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात जानेवारी 2018 पासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येबाबतची 131 प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी 48 प्रकरणे पात्र ठरली असून 49 प्रकरणे अपात्र ठरली आहे. तर 13 प्रकरणांचा अहवाल प्राप्त झाला असून 21 प्रकरणे प्रलंबित आहे.
     या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी वसंत लक्ष्मण महाजन, शेतकरी प्रतिनिधी रोहिदास पाटील यांचेसह पंचायत समित्यांचे सभापती, पोलीस अधिक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                                              ०००

सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांचा जिल्हा दौरा

     जळगाव, दि. 29-  राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख हे शनिवार दि. १  डिसेंबर, २०१८ जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
      शनिवार, दि. १ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ६ वा १५ मि.नी. अमृतसर एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी ६ वा ३० मि.नी  जळगाव रेल्वे स्थानक येथून शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी ६ वा ४५ मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी १० वाजता दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई- जळगाव शाखेचा उद्घाटन सोहळा. स्थळ :- हॉटेल सिल्वर पॅलेस, स्टेशन रोड, नवी पेठ, जळगाव. दुपारी १ वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने पाचोरा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी ३ वा. सहकार मेळावा. स्थळ :- पाचोरा, जि. जळगाव, दुपारी ४ वा ३० मि.नी पाचोरा येथून धुळेकडे प्रयाण.
                                                                  000

अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण इच्छूकांनी 10 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

     जळगाव, दि. 29 - जळगाव जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे 10 डिसेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
     यापूर्वी भरतीपूर्व परिक्षा प्रशिक्षण कार्यक्रम दि. 3 डिसेंबर, 2018 रोजी निश्चित करण्यात आला होता.  तथापि, जळगाव जिल्ह्यात दि. 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर, 2018 पर्यंत सैन्य भरती सुरु आहे. त्यामुळे सदरचे भरतीपूर्व प्रशिक्षण हे 5 डिसेंबर, 2018 नंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
            त्यानुसार आता मा. सचिव, महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 28 नोव्हेंबर, 2018 नुसार अल्पसंख्याक समाजातील तरुणांकरिता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2018-19 अतंर्गत उमेदवारांची निवड करणेसाठी 10 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पोलीस कवायत मैदान, जळगाव येथे घेण्यात येणार आहे.
            तरी या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांनी 10 डिसेंबर, 2018 रोजी नमुद केलेल्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या प्रशिक्षणाबाबत अर्ज तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी निवडीसाठी येताना पुढील कागदपत्रे सोबत आणावी.
     प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु 2.50 लाख ( रु. दोन लाख पन्नास हजार फक्त) पेक्षा जास्‍त नसलेबाबत संबंधित तहसिलदार यांचा दाखला. उमेदवार अल्पसंख्याक (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी आणि जैन) समाजातील असलेबाबत कागदोपत्री पुरावा. उमेदवार 18 ते 25 या वयोगटाबाबत जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला. उमेदवाराची उंची पुरुष 165 सेंमी व महिला 155 सेंमी. छाती पुरुष 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी) असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेबाबत गुणपत्रक. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हते बाबतची कागदपत्रे, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बौध्दांसाठी जातीचा दाखला इ. कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहिल. उमेदवार शारिरिकदृष्टया निरोगी व सक्षम असावा. असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                          ०००

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा येथे तासिका तत्वावर 7 डिसेंबर रोजी पद भरती

          जळगाव, दि. 29 - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा येथे पुढील पदांकरीता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा, जि. जळगाव यांनी दिली आहे.
         शिल्पनिदेशक-संधाता या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता बी. ई/डिप्लोमा/ आय.टी.आय.एनसीव्हीटी/ सीटीआय उत्तीर्ण असावी. गणित/अभि. चित्रकला निदेशक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता बी.ई/ डिप्लोमा/ आय.टी.आय.एनसीव्हीटी/सीटीआय उत्तीर्ण असावी.  एम्पलॉयबिलीटी स्किल या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एस.बी.ए/बी.बी.ए/कोणत्याही शाखेचा पदवीधर असावी. या सर्व पदांसाठी प्रत्येकी एक पदसंख्या उपलब्ध आहे.
      तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 7 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 11 वाजता अर्ज व सर्व मुळ कागद पत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                ०००

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ डिसेंबर रोजी

       जळगाव, दि. 29- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 डिसेंबर, 2018 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
     जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्‍यात येते. त्यानुसार या महिन्यात सोमवार, 3 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.                
                                                                         ०००

Tuesday, 27 November 2018

संविधान सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये संविधान प्रतीचे वाटप




      जळगाव, दि. 27 - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, 2018 या कालावधीत संविधान सप्ताह राबविण्यात जात आहे. या सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, समतादुत प्रकल्प (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय कार्यालयाच्या सहाय्याने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 
     जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील पंचायत समिती तसेच तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे तालुका समन्वयक, समतादुत यांच्या हस्ते संविधान प्रतीचे वाटप करण्यात आले. जळगाव येथील तालुका पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री पाईकराव यांनी केले. तर सुत्रसंचालन समातदुत मुकेश शिंदे यांनी केले. निंभोरा पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक शिला अडकमोल यांनी केली. तर सुत्रसंचालन हवालदार पाटील यांनी केले.
     याप्रमाणे जिल्ह्यातील पंचायत समिती व पोलीस स्टेशन येथे संविधान प्रतीचे वाटप करण्याचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव योगेश पाटील, कार्यालय अधिक्षक गणेश बोरसे, समतादुत प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समतादुत, तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
                                                                            ०००

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका

           जळगाव, दि. 27 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीएच-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 3 डिसेंबर, 2018 पासून सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली आहे.
      ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी दि.29 व 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा. त्यासोबत शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही मालिका चालू असतांना वाहन-4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल.
      एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 1 डिसेंबर, 2018 रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्वतंत्र बंद लिफाफ्यातून जमा करणे आवश्यक राहील. असे जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.  
                                                                     ०००

कासोदा येथील प्राथमिक आश्रमशाळेत गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पालक व शिक्षकांचा सहभाग महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर






 जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचा प्रमुख उद्देश मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे हा आहे. देशाच्या बळकटीकरणासाठी मुलांचे आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. याकरीता या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पालक व शिक्षकांनी आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
जिल्ह्यात आजपासून पुढील पाच आठवडे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 8 लाख 57 हजार 848 लाभार्थी आहेत. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आश्रमशाळा, कासोदा, ता. एरंडोल येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, एरंडोल विभागाचे उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अर्चना खेतमळीस, युनिसेफचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रकाश नंदापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, पंचायत समिती सभापती अनिल महाजन, सरपंच भैय्याभाऊ राक्षे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, गोवर हा अत्यंत संक्रमक व घातक आजार असून तो मुख्यत: मुलांना होतो. रुबेला हा त्या मानाने सौम्य संक्रमक आजार आहे. तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. त्यामुळे देशातून गोवर- रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी देशभरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ज्याप्रमाणे यशस्वीपणे राबविण्यात आली. त्याचप्रमाणे ही मोहिम राबविण्यात यावी. ही मोहिम म्हणजे आरोग्याचा यज्ञ आहे. हा यज्ञ पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यासह सर्वांनी या मोहिमेत आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
 जिल्ह्यात आजपासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. पुढील पाच आठवडे ही मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ही लस देण्यात येईल. या लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकरांसह इतर मान्यवरांनी आश्रमशाळेतील लसीकरण केंद्रात जाऊन तेथील उपस्थित मुलांशी संवाद साधला. तसेच यापैकी काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लसीकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी आश्रमशाळेस भेट देत तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी माहिती जाऊन घेतले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे वजन, उंची त्यांचेसमोरच मोजण्यात आली.
        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर म्हणाल्या की, मोहिमेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या वयोगटातील लाभार्थी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील असून एकूण लाभार्थ्यांपैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. मोहिम सुरु झाल्यानंतर किमान 4 ते 5 आठवड्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 380 शाळांमध्ये एकूण 4366 लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. पहिल्या 2 आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येऊन त्यानंतर उर्वरित 35-40 टक्के लाभार्थ्याचे गोवर रुबेला लसीकरण 3639 नंतरच्या 2 आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्र एकूण 3033 दुर्गम अति जोखमीचा भाग मधील एकूण सत्र 135 व संस्थेतील एकूण सत्र 2483 मध्ये असे एकूण जिल्ह्यातील 10 हजार 17 सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येईल असे सांगितले. गोवर रुबेला मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या 9 महिने ते 15 वर्षे पर्यतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी. ही लस पूर्णत: मोफत असणार असल्याचेही डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व धन्वतंरीच्या पुजनाने करण्यात आली. यावेळी गोवर-रुबेलावर आधारित गीताचे गायन करण्यात आले.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले. यावेळी गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेची प्रचार प्रसिध्दी करणारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर पाटील कुंझरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आरोग्यसेविका शोभाताई पाटील यांचा जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चाळीसगाव मिलेनियम रोटरी क्लबच्यावतीने तयार करण्यात आलेल्या गोवर-रुबेला पोस्टरचे विमोचनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

Monday, 26 November 2018

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी किशार राजे निंबाळकर


             



            जळगाव, दि. 26 - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आजपासून जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमे सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशार राजे निंबाळकर यांनी केले.
            जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
           या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. शिवाजी भालशंकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त वि. ता. जाधव, श्री. बेंडकुळे, विभागीय वाहतुक अधिकारी श्री. प्रल्हाद घुले, उप मंडळ अभियंता दुरसंचार श्री. एस. डी. उमराणे, वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक श्री. रा. भ. बांगर, जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाचे एस. आर. पाटील, अशासकीय सदस्य नितीन मनोहर बरडे, डॉ. अर्चना विशाल पाटील, सौ. पल्लवी चौधरी, विलास उत्तमराव महाजन, रमेश जगन्नाथ सोनवणे, सतीष मुरलीधर गडे, विजय सदाशिव मोहरीर, विकास हिराचंद कोटेचा, नरेंद्र बाळू पाटील, बाळकृष्ण वाणी आदि  उपस्थित होते.
             जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्रामुख्याने ग्राहक संरक्षण समिती सदस्यांद्वारे यावल स्टेट बँकेतील अनेक रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा मिळण्यात येणा-या अडचणी, यावल येथील आठवडे बाजाराच्या जागेविषयी चर्चा, बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेच्या खंडीत केलेल्या वीज पुरवठ्याबाबत, भालोद-पिळोदा रस्ता अर्धवट स्थितीत बंद असल्याबाबत, केळी, कापूस, उस यांचे वजनमापा विषयीच्या तक्रारी मांडण्यात आल्यात. यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केल्यात. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, पंचायत समिती, नगर पालिकांच्या कामाविषयी तक्रारींबाबत तसेच रस्ते, वीज, पाणी इत्यादी तक्रारींबाबत संबंधित विभागांनी अचानक धाडी टाकून अवैध धंदे तसेच चुकीचे किंवा जाणीवपूर्वक कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात.
            या बैठकीत सदस्यांनी मागील बैठकीत केलेल्या तक्रारींच्या निपटाराबाबतही आढावा घेण्यात आला. यापुढे  सदस्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आणण्याच्या सुचना करण्यात आल्यात. त्याचबरोबर मतदार याद्यांमधील नाव, पत्त्यांविषयी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर म्हणाले की, मतदारांनी आपली नावे शासकीय कर्मचारी, बी. एल. ओ किंवा संबंधित तहसिल कार्यालयात जावून नोंदवावी. किंवा दुरूस्ती असल्यास करून घ्याव्यात सर्व मतदारांनी यादीमधील आपले नाव, पत्ता व्यवस्थित असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना केले.
      शेवटी सर्व उपस्थित सदस्यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. राहुल जाधव यांनी आभार मानले.
000