Friday, 30 November 2018

जिल्हा प्रशासन लागले लोकसभा निवडणूकीच्या कामाला निवडणूकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

         जळगाव, दि. 30 - आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे. यासाठी सर्व विभागांनी आपआपसात समन्वय साधून पूर्वतयारी करावी. तसेच प्रत्येक विभागाने त्यांच्यावर सोपविलेल्या कामांचे पूर्वनियोजन करुन अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. गुरूवार, 29 नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची निवडणूकीची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
          या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. प्रशांत सोनवणे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जयंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन श्री. रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती  शुभांगी भारदे, महानगर पालिकेचे उपायुक्त चंद्रकांत खोसे, राज्य मार्ग परिवहन महामंडाळाचे विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र देवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. प्रमोद बोरले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पंडीत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अरूण प्रकाश, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, महेश पत्की आदि अधिकारी उपस्थित होते.
         बैठकीत जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी विविध विभागांना विभागवार जबाबदारी सोपविली त्यात  पोलीस विभागाने निवडणूक काळात अवैध धंदे रोखणे, हद्दपारीच्या कार्यवाही करणे, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, अतिसंवेदनशिल व संवेदनशील केंद्र निश्चित करणे, प्लॉईंग स्कॉड तयार करणे, पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन तयार करणे, मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी बंदोबस्तासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, त्याची उपलब्धता कशी होईल आदिंचे नियोजन करणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत निवडणूकीच्या काळात उपलब्ध होवू शकणाऱ्या बसेसबाबत माहिती घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री व वाहतूकीला आळा घालणे, तसेच सीमेवर चेकपोस्ट तयार करणे, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांचा डेटा तयार करणे तसेच निवडणूक संदर्भातील विषयांबाबत समन्वय साधणे, सार्वजनिक बांधकाम विभागाने निवडणूक कालावधीत येणाऱ्या निवडणूक निरिक्षकांसाठी निवास व्यवस्था करण्यासाठी विश्रमागृहाची दुरूस्तीची कामे करणे. त्याचबरोबर निवडणूक काळात बँकेमार्फत होणाऱ्या व्यवहारांवर नजर ठेवणे व संशयास्पद व्यवहाराची माहिती घेणे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींची माहिती संकलीत करणे, दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, निवडणूक उपजिल्हाधिऱ्यांनी निवडणूकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची व वाहनांची माहिती घेणेबाबत विविध विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्यात.
          जिल्ह्यात रावेर व जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ असून एका मतदारसंघासाठी प्रत्येकी 5 असे एकूण दहा निवडणूक निरिक्षक येणार आहे. जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी एकूण 3 हजार 646 मतदान केंद्र असून त्यानुसार प्रत्येक मतदार केंद्राला प्रत्येकी 5 व 20 टक्के राखीव कर्मचारी  व इतर कामकाज याप्रमाणे अंदाजे 26 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्याला 4 हजार 354 कंट्रोल युनिट व 7 हजार 488 बॅलेट यूनिट प्राप्त झाले आहेत. निवडणूकीच्या कामासाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी व आवश्यक असणाऱ्या साहित्याची ने-आण करण्यासाठी एकूण 2 हजार 321 वाहनांची आवश्यकता भासणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी बैठकीत दिली.
                                                                              000

No comments:

Post a Comment