Tuesday, 13 November 2018

अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यात दाखल वैजापूर व पाल येथे देणार भेटी



      जळगाव, दि. 13 - भोपाळ येथील केंद्रीय प्रशिक्षण अकादमीतील अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवेच्या दहा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे पथक पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आज जिल्ह्यात दाखल झाले आहे. या दौऱ्यात हे अधिकारी वैजापूर, ता. चोपडा आणि पाल, ता. रावेर या गावांना भेटी देऊन अभ्यास करणार आहे.
     या अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे,  अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी, भुसावळ रेल्वे परिमंडळाचे महाप्रबंधक आर. के. यादव, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह रेल्वे, पोलिस व महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर  यांनी त्यांना जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक व प्रादेशिक माहिती देतांनाच ‘बनाना सिटी’ ते ‘गोल्ड सिटी’ बाबत माहिती देऊन जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, जिल्ह्यातील शेतीचे तंत्र, भुसावळ रेल्वे जंक्शन, वरणगाव ऑर्डिन्स फॅक्टरी, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आदिंबाबत माहिती दिली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्या कामाचे स्वरुप व पध्दती याबाबतही माहिती दिली. तर जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. शिंदे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, हाताळण्याची पध्दती, यासाठी वापरण्यात येणारी पध्दती, गुन्हेगारी रोखण्याच्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच महाप्रबंधक श्री. यादव यांनी रेल्वे सेवेबाबतची माहिती दिली.
     या अधिकाऱ्यांच्या पथकात भारतीय पोलीस सेवेतील किरण श्रृती डी. व्ही., वाय. रिशांत रेड्डी, शेख फरीद जे., व्ही. व्ही. साई प्रनीथ, जी. कृष्णकांत, भारतीय महसुल सेवेतील प्रणव अनंत कानीटकर, श्री. सोमय्या, भारतीय वन सेवेतील व्यंकोथ चेतन कुमार, भारतीय रेल्वे वाहतुक सेवेतील अरविंद प्रदीप एस व भारतीय माहिती व प्रसाण सेवेतील नवीन श्रीजीत यु. आर यांचा समावेश आहे.

‘दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा’ विशेष अंकाचे प्रकाशन
               याप्रसंगी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या नोव्हेंबर 2018 च्या ‘दीपोत्सव महाराष्ट्राच्या प्रगतीचा’ या विशेष अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
           या अंकात गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषि, पर्यटन व पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली आहे. याबाबत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार अमोल निकम, राजशिष्टाचार अधिकारी श्री. वानखेडे आदि उपस्थित होते.
     या दौऱ्यात हे प्रशिक्षणार्थी अधिकारी वैजापूर, ता. चोपडा आणि पाल, ता. रावेर या गावांना भेटी देणार आहे. दिं. 13 नोव्हेंबर रोजी हे अधिकारी या गावांतील तलाठी कार्यालयास भेट देणार असून याठिकाणी ते जमिनीच्या रेकॉर्डचा अभ्यास करतील. दिं. 14 नोव्हेंबर रोजी ते ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा अभ्यास करणार आहे. तर दिं. 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती घेऊन अभ्यास करतील. दि. 16 नोव्हेंबर रोजी प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देतील. व दि. 17 नोव्हेंबर रोजी गावातील विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून  विविध विषयांवर चर्चा करणार आहे.
                                                                      000

No comments:

Post a Comment