Monday, 26 November 2018

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेनिमित्त शहरात जनजागृती रॅली संपन्न





           जळगाव दि. 26 - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात आजपासून (27 नोव्हेंबर) गोवर व रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची जिल्ह्यात व्यापक जनजागृती व्हावी. याकरीता आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जी एस. ग्राऊड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गोवर व रुबेला मोहिमेची शालेय मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली.
     या मोहिमेच्या प्रभातफेरीची सुरवात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रभातफेरीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सर्व शाळेचे विद्यार्थी व उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना संविधानाची शपथ दिली. तसेच गोवर व रुबेला मोहिमेचे महत्व सांगून जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षाच्या आतील बालकांना लसिकरण करुन घेण्याचे आवाहन केले.
       या प्रभातफेरीत जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय, पुष्पावती गुडवे, नुतन मराठा विद्यालय, ला. ना. विद्यालय, प. न. लुंकड कन्या विद्यालय, विद्यानिकेतन, अभिनव विद्यालय आदि शाळांमधील अंदाजे 2500 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरात काढण्यात आलेल्या प्रभातफेरीत गोवर व रुबेला मोहिमेच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या.
     या प्रभातफेरीत दिलीप पाटील, आरोग्य सभापती, जि.प., जळगाव. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापुरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी. जे. पाटील, श्री. ए. बी. गायकवाड, उपशिक्षणाधिकारी, श्रीमती सरला पाटील, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, डॉ. समाधान वाघ, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. प्रमोद पांढरे, डॉ. वि.आर. पाटील, डॉ. दिलीप पोटोड आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत पंगतीत बसून घेतला शालेय पोषण आहाराचा आस्वाद
         या प्रभातफेरीची सांगता झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी विद्यानिकेतन विद्यालयास सदिच्छा भेट दिली व या भेटीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत पंगतीमध्ये बसून जेवण (शालेय पोषण आहार) केले.   
        या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील विलास बोंडे, वि.अ, बि. टी. सुर्यवंशी, आरोग्य  सहायक श्रीमती विद्या राजपुत, डी. पि. एच. एन श्री. मिलिद लोणारी यांनी प्रयत्न केले. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment