जळगाव,
दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) - गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचा प्रमुख उद्देश मुलांचे
आरोग्य सुदृढ राहावे हा आहे. देशाच्या बळकटीकरणासाठी मुलांचे आरोग्य सुदृढ राहणे
आवश्यक आहे. याकरीता या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी पालक व शिक्षकांनी आपला
महत्वपूर्ण सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
केले.
जिल्ह्यात
आजपासून पुढील पाच आठवडे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या
लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 8 लाख 57 हजार 848 लाभार्थी आहेत. या लसीकरण मोहिमेचा
शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या प्रमुख
उपस्थितीत प्राथमिक आश्रमशाळा, कासोदा, ता. एरंडोल येथे करण्यात आला. यावेळी
जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील, अतिरिक्त
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, एरंडोल विभागाचे उप विभागीय अधिकारी
विजयानंद शर्मा, तहसीलदार अर्चना खेतमळीस, युनिसेफचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रकाश नंदापूरकर,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी
बी. जे. पाटील, जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, पंचायत समिती सभापती अनिल
महाजन, सरपंच भैय्याभाऊ राक्षे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, गोवर हा अत्यंत संक्रमक व घातक आजार असून तो
मुख्यत: मुलांना होतो. रुबेला हा त्या मानाने सौम्य संक्रमक आजार आहे. तो मुलांना
तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. त्यामुळे देशातून गोवर- रुबेला या आजारांचे
निर्मूलन करण्यासाठी देशभरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात
यापूर्वी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ज्याप्रमाणे यशस्वीपणे राबविण्यात आली.
त्याचप्रमाणे ही मोहिम राबविण्यात यावी. ही मोहिम म्हणजे आरोग्याचा यज्ञ आहे. हा
यज्ञ पूर्णत्वास जाण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आंगणवाडी सेविका,
आशावर्कर यांच्यासह सर्वांनी या मोहिमेत आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
यांनी केले.
जिल्ह्यात आजपासून लसीकरण मोहिम सुरु झाली आहे.
पुढील पाच आठवडे ही मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ही
लस देण्यात येईल. या लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्यात आले
असल्याचे जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकरांसह
इतर मान्यवरांनी आश्रमशाळेतील लसीकरण केंद्रात जाऊन तेथील उपस्थित मुलांशी संवाद
साधला. तसेच यापैकी काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लसीकरण
प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी आश्रमशाळेस
भेट देत तेथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी माहिती जाऊन घेतले. त्याचबरोबर
विद्यार्थ्यांचे वजन, उंची त्यांचेसमोरच मोजण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर
म्हणाल्या की, मोहिमेसाठी निर्धारित करण्यात आलेल्या वयोगटातील लाभार्थी 9 महिने
ते 15 वर्षे वयोगटातील असून एकूण लाभार्थ्यांपैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे
शाळेत जाणारे आहेत. मोहिम सुरु झाल्यानंतर किमान 4 ते 5 आठवड्यांच्या कालावधीत
पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 380 शाळांमध्ये एकूण 4366 लसीकरण
सत्र राबविण्यात येणार आहे. पहिल्या 2 आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येऊन
त्यानंतर उर्वरित 35-40 टक्के लाभार्थ्याचे गोवर रुबेला लसीकरण 3639 नंतरच्या 2
आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्र एकूण 3033 दुर्गम अति जोखमीचा भाग
मधील एकूण सत्र 135 व संस्थेतील एकूण सत्र 2483 मध्ये असे एकूण जिल्ह्यातील 10
हजार 17 सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येईल असे सांगितले. गोवर रुबेला
मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या 9 महिने ते 15 वर्षे पर्यतच्या सर्व
मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी. ही लस पूर्णत: मोफत असणार असल्याचेही डॉ.
कमलापूरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व धन्वतंरीच्या
पुजनाने करण्यात आली. यावेळी गोवर-रुबेलावर आधारित गीताचे गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले. यावेळी गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेची
प्रचार प्रसिध्दी करणारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर पाटील
कुंझरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आरोग्यसेविका शोभाताई पाटील यांचा
जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चाळीसगाव मिलेनियम
रोटरी क्लबच्यावतीने तयार करण्यात आलेल्या गोवर-रुबेला पोस्टरचे विमोचनही
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या
कार्यक्रमास ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment