Sunday, 24 June 2018

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज मतदानासाठी अधिकारी, कर्मचारी साहित्यासह रवाना





            जळगाव, दि. 24 -  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी आज (25 जून) जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य आज जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथून या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाटप करुन अधिकारी व कर्मचारी यांना साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. 

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, चिटणीस मंदार कुलकर्णी, तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांचेसह निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण 21 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये जळगाव तालुक्यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन तर  धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान केंद्राचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 12056 इतके मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 9363, तर स्त्री मतदारांची संख्या 2693 इतकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 2380 मतदार जळगाव तालुक्यात असून त्यानंतर भुसावळ तालुक्यात 1364, अमळनेर तालुक्यात 1033 तर चाळीसगाव तालुक्यात 992 इतके मतदार आहे.  

या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती भरारी पथके कार्यरत आहे.या पथकांसमवेत व्हिडिओग्राफर देण्यात आले आहेत. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरीता केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. 

या निवडणूकीसाठी सेक्टर ऑफिसर म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी त्या त्या तालुक्याचे तहसीलदार हे मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असणार आहेत. तर सूक्ष्म निरीक्षक म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकाचे अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर प्रत्येक तालुक्यातील नायब तहसीलदार यांचा भरारी पथकामध्ये समावेश करण्यात आला असून आज हे सर्व अधिकारी, कर्मचारी मतदानासाठी लागणारे साहित्य घेऊन त्यांना नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राकडे पोलीस बंदोबस्तात रवाना झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान केंद्र यादी

जळगाव- आर.आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, खोली क्र. 6, आणि
आर. आर. विद्यालय, पूर्व-पश्चिम इमारत, जिमखाना टेनिस रुम जवळील खोली क्र. 13,
भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर, पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. 2,
भाऊसाहेब काशिनाथ लाठी विद्यामंदिर पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र.4,
अमळनेर- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय आणि
राजसारथी सभागृह, अमळनेर
भुसावळ- डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडील खोली क्र.2 आणि 
डी. एस. हायस्कूल, भुसावळ पूर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत, उत्तरेकडील खोली क्र. 3,
चाळीसगाव- नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र.3 आणि
नानासाहेब वाय. एन. चव्हाण कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव पूर्वेकडील उत्तर-दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्र.5,
चोपडा- तलाठी मिटींग हॉल, तहसिल कार्यालय,
यावल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय,
रावेर- संजय गांधी योजना शाखा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नविन तहसिल कार्यालय,
मुक्ताईनगर- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय,
बोदवड- सभागृह तहसिल कार्यालय,
धरणगाव- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय,
एरंडोल- तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय,
पारोळा- मिटींग हॉल तहसिल कार्यालय,
भडगाव- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय,
पाचोरा- तहसिलदार यांचे दालन तहसिल कार्यालय,
जामनेर- जि.प.प्राथमिक शाळा मेन हॉल, वाकी रोड, जामनेर

000


No comments:

Post a Comment